कोल्हापूरच्या करवीर विधानसभेतून कोण मारणार बाजी ? पाटील की नरके कोण जिंकणार ?
विधानसभेसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. कोल्हापूरातील करवीर विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध कॉंग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांच्यात पारंपरिक लढत होत असून तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूरातील गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर अशा तीन तालुक्यांचा हा करवीर विधानसभा मतदार संघ आहे. कोल्हापूरातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जात आहे.साल 2019 मध्ये येथे कॉंग्रेसचे पी. एन.पाटील यांचा विजय झाला होता. मागच्या दोन निवडणूकात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यंदा स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. लोकसभा निवडणूकीत याच मतदार संघातून शाहू महाराज यांना 70 हजाराचे लीड मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत या मतदार संघात काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.
करवीर विधानसभा निकाल ( 2014 )
उमेदवाराचे नाव | पक्षाचे नाव | एकूण मते |
---|---|---|
चंद्रदीप नरके | शिवसेना | 1,07,998 |
पी.एन.पाटील | कॉंग्रेस | 1,07,288 |
राजू सुर्यवंशी | जनसुराज्य शक्ती | 18,964 |
कोल्हापूरच्या राजकारणात अनेक गट आणि तट आहेत. येथे राजकीय पक्षा पेक्षा गटा- तटाचे राजकारण चर्चेत असते. पी.एन.गट, बंटी पाटील गट, मुश्रीफ गट, महाडीक गट, घाटगे गट, कोरे गट, माने गट आणि नरके गट असे येथे अनेक गटाचे प्राबल्य चालत आहे.थोडक्यात काय जेवढे नेते तेवढे गट ही कोल्हापूरातील राजकारणाची ओळख आहे.करवीर विधानसभा मतदार संघात तीन तालुक्यातील 275 गावांचा समावेश आहे. त्यात करवीर तालुक्यातील 102, पन्हाळा तालुक्यातील – 68 आणि गगनबावडा तालुक्यातील – 44 गावांचा समावेश आहे.
करवीर विधानसभा निकाल ( 2019 )
उमेदवाराचे नाव | पक्षाचे नाव | एकूण मते |
---|---|---|
पी.एन.पाटील | कॉंग्रेस | 1,35,675 |
चंद्रदीप नरके | शिवसेना | 1,13,014 |
डॉ.आनंदा गुरव | वंचित बहुजन आघाडी | 4,412 |
निकालापूर्वी निधन
करवीर येथील विद्यमान आमदार पी. एन. पाटील यांचे लोकसभा निवडणूकीच्या निकालापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी पी.एन.पाटील यांचे पूत्र राहुल पाटील यांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून येथे राहुल पाटील आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना तिकीट दिल्याने या दोघांमध्ये लढत होणार आहे.
कॉंग्रेसने शेकापचा किल्ला घेतला
करवीर विधानसभा क्षेत्रावर आधी शेकापचे वर्चस्व होते. नंतर कॉंग्रेसने येथे आपला झेंडा फडकावला आहे. पी.एन.पाटील यांनी शेकापकडून हा मतदार संघ काढून घेतला.त्यानंतर कॉंग्रेसचे पी.एन.पाटील विरुद्ध शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांच्यात सामना होत आला आहे. यात पी.एन. पाटील यांचा दोन वेळा पराभव झाला आहे. मात्र साल 2019 च्या निवडणूकीत चंद्रदीप नरके यांचा पी.एन.पाटील यानी पराभव केला.त्यावेळी नरके यांना फारशी कोणाची साथ मिळालेली नव्हती. या मतदार संघात पुन्हा विधानसभेचा रणसंग्राम सुरु झाला आहे. लोकसभेला या मतदार संघातून महायुतीचे उमेदवार शाहु महाराज यांना मिळालेली आघाडी तसेच पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती ही राहुल पाटील यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे.
महायुतीला प्रचंड कष्ट पडणार
सतेज पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात याच तालुक्यातून केली असल्याने त्यांचा देखील येथे स्वतंत्र गट आहे. करवीर प्रमाणेच सतेज पाटील यांचा गगनबावडा या तालुक्यात प्रभाव आहे.या तालुक्यात साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी चांगलेच जाळे निर्माण केलेले आहे. तर कुंभी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणारी गावे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या जमेची बाजू आहे. महाडीक गटाच्या सोबत येण्याने नरके यांच्या बळ वाढलेले आहे.आमदार विनय कोरे यांच्या पन्हाळा तालुक्यात प्रभाव आहे. या तालुक्यातील 68 गावे करवीर मध्ये मोडतात. या भागात कॉंग्रेसचे असलेले प्राबल्य तसेच लोकसभा निवडणूकीत या भागातून शाहु महाराज यांना मिळाले यश पाहाता या मतदार संघात निवडून येण्यासाठी महायुतीला प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत हे स्पष्ट आहे.
कोणाचे पारडे जड
कॉंग्रेसचे नेते पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र राहुल पाटील यांना सुहानुभूती आहे. तसेच करवीर या मतदार संघाच्या विजयासाठी सतेज पाटील यांच्या ताकद राहुल पाटील यांच्या विजयासाठी महत्वाची ठरणार आहे.तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांची ताकद महत्वाची ठरणार आहे. स्वर्गीय पी.एन.पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील यांना सहानुभूती असून यावेळी शेकापची ताकदही राहुल पाटील याना मिळणार आहे. दुसरीकडे नरके यांना विरोधी गटातील अनेक कार्यकर्ते फोडण्यात यश मिळाल्याने त्यांचा लाभ कसा मिळणार यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून आहे. महायुतीच्या सरकारमुळे नरके यांनी विकासकामे आणि जनसंपर्काच्या जोरावर जाहीरातबाजी करीत मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केलेली आहे.