सलग 75 रविवार स्वच्छता मोहिमांचा धडाका, कोल्हापूरचे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली
मल्लिनाथ कलशेट्टी हे सलग 75 रविवार स्वच्छता मोहीम राबवणारे कोल्हापुरातील पहिले आयुक्त ठरले होते.
कोल्हापूर : सायकलवर फेरफटका मारत मास्क न घातलेल्या नागरिकांची खरडपट्टी काढणाऱ्या कोल्हापूर महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा नवा ठिकाणा मात्र अद्याप ठरलेला नाही. स्वच्छतेविषयीच्या धडपडीमुळे त्यांना स्वच्छता दूत अशी नवी ओळख मिळाली आहे. (Kolhapur Municipal Commissioner Mallinath Kalshetty transferred)
कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांच्या जागी कादंबरी बलकवडे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बलकवडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारी होत्या. मात्र कलशेट्टी यांना बदलीनंतर कुठे पाठवायचे, हे अजून ठरलेले नाही.
कोरोना संसर्गाच्या काळात कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी असताना मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उल्लेखनीय काम केले होते. सलग 75 रविवार स्वच्छता मोहीम राबवणारे कोल्हापुरातील ते पहिले आयुक्त ठरले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो मास्क नो एन्ट्री’ ही मोहीम गतिमान होत असताना डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सायकलवरुन प्रवास करत मास्क न घालणाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. ‘मास्क घालतोस की दंड करु?’ असे खडे बोल सुनावत त्यांनी जनजागृती केली होती. महापालिकेच्या आयुक्तांना सायकलवरुन प्रवास करताना पाहून अनेकजण अवाक झाले. अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
“बाबांनो मास्क घाला, तुमच्यासाठीच सांगत आहे रे, राजांनो” असे पोटतिडकीने लहान मुलांना सांगत त्यांनी काळजीही दाखवली. त्यामुळे डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या कामाच्या पद्धतीचा आणखी एक रुप कोल्हापूरकरांना पाहायला मिळाले होते.
कोल्हापूर महानगरपालिकेत महिन्याचा शेवटचा दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळला जातो. नगरसेवक किंवा अधिकारी हे शासकीय किंवा खाजगी वाहन वापरुन महापालिकेत येत नाहीत. सुरुवातीच्या काळात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला मात्र नंतर बहुतांशी पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना याचा विसर पडला. मात्र, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी नियम पाळत राहिले (Kolhapur Municipal Commissioner Mallinath Kalshetty transferred)
अविरतपणे स्वच्छता मोहीम
कोल्हापुरात आयुक्त म्हणून दाखल झाल्यापासून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहिमेचा उपक्रम सुरु केला. याला शहरातील तालीम मंडळ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे कलशेट्टी यांनी सलग 75 रविवारी अखंडितपणे ही स्वच्छता मोहीम सुरु ठेवली. त्यांच्या या स्वच्छता विषयीच्या धडपडीमुळे त्यांना स्वच्छता दूत अशी देखील एक नवी ओळख मिळाली.
Dharavi Pattern | धारावीतील कोरोना पॅटर्नची ‘ऑक्सफर्ड’कडून दखल, तर अहमदनगरच्या सुपुत्राचेही कौतुक https://t.co/soR8jgWpav #Oxford @Vijaykulange #dharavi
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
संबंधित बातम्या :
‘मास्क घालतोस की दंड करु’, सायकलवरुन फेरफटका, कोल्हापूरच्या आयुक्तांकडून खरडपट्टी
(Kolhapur Municipal Commissioner Mallinath Kalshetty transferred)