भाजप सोडण्याआधी समरजित घाटगे यांची देवेंद्र फडणवीसांशी काय चर्चा झाली?
Samarjeet Ghatge and Devendra Fadnavis Discussion : समरजित घाटगे हे आज राष्ट्रवादी शरज पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या पक्ष प्रवेशाची कागल विधानसभा मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा होत आहे. या निर्णयाआधी समरजित घाटगे यांनी देवेंद्र फडणवीसांची काय चर्चा केली? वाचा सविस्तर...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज मोठी घडामोड घडत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता कागलमधील गैबी चौक मैदानात शरद पवार हा पक्षप्रवेश होणार आहे. समरजित घाटगे यांनी हा निर्णय का घेतला? त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय चर्चा केली? या दोन नेत्यांमध्ये काय बोलणं झालं? याबाबत समरजित घाटगे यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
फडणवीसांसोबत काय चर्चा?
भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेण्याआधी समरजित घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत संवाद साधला. भाजपला सोडण्याचा निर्णय घेताना मी आमचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना माझी बाजू सांगितली. आम्हा दोघांमध्ये जी चर्चा झाली ती मी सार्वजनिक करू शकत नाही. पण एवढं सांगतो की, मी त्यांना सांगितलं मला हा निर्णय विधानसभेसाठी घ्यावा लागतोय. राजकीय नेता म्हणून तुम्ही मला थांबवणं बरोबर आहे. पण माझे थोरले भाऊ म्हणून तुम्हीही विचार करा अन् मला या निर्णयाची स्वायत्तता द्या. असं मी फडणवीसांना सांगितलं. त्यापुढे ते काही बोलू शकले नाहीत, असं समरजित घाटगे म्हणाले.
त्या निर्णयावर मी ठाम होतो- घाटगे
मी पक्ष सोडलेला नाही. पक्षच मला न्याय देऊ शकला नाही. मला उमेदवारी देऊ शकला नाही. मी विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यांनी मला विधानसभेची ऑफर देण्याआधीच मी काही गोष्टींचं स्पष्टीकरण दिलं. मी त्यांना सांगितलं की, विधान परिषदेवर जाण्यासाठी अजिबात तयार नाही. कारण मी लोकांच्यासाठी लढणारा व्यक्ती आहे. मला लोकांमधून निवडून यायचं आहे. असं मी त्यांना ठामपणे सांगितल्याचं समरजित घाटगे म्हणाले.
ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी अनेकजण भाजपमध्ये, भाजपसोबत जात असताना हा निर्णय घेताना भीती वाटत नाही का? असं विचारण्यात आलं. तेव्हा भीतीचा प्रश्नच नाही. कारण मी कागल- गडहिंग्लज उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेसाठी हा निर्णय घेतला आहे. आधीपासूनच अगदी राजेंच्या काळापासूनच आमचा कारभार हा पारदर्शक आहे. त्यामुळेच आमच्या साखर कारखान्याला पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे मला कशाचीही भीती नाही, असं समरजित घाटगे म्हणाले.