भारताचे पहिले हिंदकेसरी हरपले, कोल्हापूरचे कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचं निधन
1959 मध्ये पंजाब केसरी बच्चा सिंग याला पराभूत करत श्रीपती खंचनाळे यांनी पहिला हिंदकेसरी किताब पटकावला होता
कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक व्याधींनी त्रस्त होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. खंचनाळेंच्या निधनामुळे कोल्हापुरातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दादू चौगुले यांच्यानंतर कोल्हापुरातल्या कुस्ती क्षेत्रातला आणखी एक तारा निखळला. (Kolhapur wrestler First Hind Kesari Shripati Khanchnale passed away)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा हे श्रीपती शंकर खंचनाळे यांचे मूळ गाव. 10 डिसेंबर 1934 रोजी खंचनाळे यांचा जन्म झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीपती खंचनाळे यांना लहानपणापासूनच शारीरिक कसरती आणि कुस्तीची आवड होती. याच आवडीतून त्यांनी बालवयातच कोल्हापुरातील शाहुपुरी तालीम गाठली आणि आपला कुस्तीचा सराव सुरु केला.
पहिला हिंदकेसरी किताब
त्यावेळचे मल्ल मल्लाप्पा फडके आणि विष्णू नागराळे यांचा विशेष प्रभाव खंचनाळे यांच्यावर होता. 1950 पासून खंचनाळे यांनी कुस्तीला गांभीर्याने घेतलं आणि त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये ते विजयी झाले. 1959 मध्ये पंजाब केसरी बच्चा सिंग याला पराभूत करत श्रीपती खंचनाळे यांनी पहिला हिंदकेसरी किताब पटकावला आणि सगळ्यात कुस्ती विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
महाराष्ट्र केसरीही पटकावला
तत्कालीन प्रसिद्ध मल्ल आनंद शिरगावकर यांना त्याच वर्षी खंचनाळे यांनी कराड इथल्या मैदानात दोन मिनिटात आस्मान दाखवलं आणि महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. पुढे 1965 मध्ये त्यांनी ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धाही जिंकली. श्रीपती खंचनाळे यांनी कुस्तीमध्ये आपला वेगळा दरारा निर्माण करुन मानाचं स्थान मिळवलं होतं. वयाच्या सातव्या वर्षांपासून कुस्ती खेळायला सुरु करणारे श्रीपती खंचनाळे वयाच्या 56 व्या वर्षापर्यंत मैदानात शड्डू ठोकत होते. या काळात त्यांनी अनेक मल्लही घडवले.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरु कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राने कुस्तीला लोकाश्रय आणि राजाश्रय दिला. या कुस्तीवर महाराष्ट्राचे नाव कोरण्याची किमया ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांनी केली. देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले. अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. (Kolhapur wrestler First Hind Kesari Shripati Khanchnale passed away)
काळानुसार कुस्तीच्या खेळातील बदलांकडेही खंचनाळेंनी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले. त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपले आहे, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्याकडूनही आदरांजली :
देशात पहिल्यांदा #हिंदकेसरी बनण्याचा बहुमान मिळवणारे श्रीपती खंचनाळे (वस्ताद) (८६) यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालं. श्री.खंचनाळे यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी झाली. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/bseKEm6HQX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 14, 2020
संबंधित बातम्या :
कुस्तीतील भीष्माचार्य दादू चौगुले यांचे निधन
(Kolhapur wrestler First Hind Kesari Shripati Khanchnale passed away)