मोठी बातमी : 5 दिवसांपासून संभाजीराजे नॉट रिचेबल; कुटुंबालाही थांगपत्ता नाही
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Not Reachable : कोल्हापुरातून मोठी बातमी... माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मागच्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याबाबत कुटुंबियांनाही थांगपत्ता नाहीये. संभाजीराजे यांचा कुणाशीही संपर्क नाहीये. संभाजी अज्ञातस्थळी असल्याचं कळतंय.
भूषण पाटील, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी | 07 फेब्रुवारी 2024 : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मागच्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. संभाजीराजे नेमके कुठे आहेत? याचा कुटुंबालाही थांगपत्ता नाहीये. तीन फेब्रुवारीला संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापुरातील विकासकामांचं उद्घाटन होणार होतं. त्यांचा नियोजित दौरा होता. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी दोन फेब्रुवारीला एक ट्विट केलं होतं. काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व!, असं ट्विट त्यांनी केलं. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत.
काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व ! 🙏
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 2, 2024
काय कारण?
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संभाजीराजे चाचपणी करत आहेत. ते दौरे करत आहेत. संभाजीराजे या मतदारसंघातून तयारी करत आहेत. अशातच महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा होते आहे. शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे नॉटरिचेबल आहेत.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजर राहणार?
11 फेब्रुवारीला संभाजीराजे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे संभाजीराजेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संभाजीराजे जेव्हा संपर्कात येतील तेव्हा ते काय बोलणार? त्यांची भूमिका काय असेल, हे जेव्हा संभाजीराजे बोलतील तेव्हाच स्पष्ट होईल.
संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होत आहे. यावर संभाजीराजे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर शेअर केली होती. स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे, असं संभाजीराजे म्हणाले होते.