आधुनिक श्रावणबाळ! 80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मालाड ते वाशिम 350 किमी प्रवास
वाशिम येथील एका बांधकाम मजूराने 80 वर्षांच्या आपल्या वडिलांना खांद्यावर घेत तब्बल 350 किलोमीटरचा पायी प्रवास केल्याचं समोर आलं आहे (Washim Labour walk with father on shoulder ).
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी मजूर अडकले आहेत. अशातच आता हालअपेष्टा होत असल्याने अखेर अनेक मजूर लॉकडाऊन उठण्याची वाट न पाहता पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत. अशातच वाशिम येथील एका बांधकाम मजूराने 80 वर्षांच्या आपल्या वडिलांना खांद्यावर घेत तब्बल 350 किलोमीटरचा पायी प्रवास केल्याचं समोर आलं आहे (Washim Labour walk with father on shoulder ). वडिलांना चालता येत नाही आणि मुंबईत राहूही शकत नाही, अशा स्थितीत या आधुनिक श्रावण बाळाने वडिलांना मागे न ठेवता आपल्यासोबत गावाकडे प्रवास केला.
वडिलांसह 350 किलोमीटरची पायपीट करणाऱ्या या व्यक्तीला मजूर म्हणा, बांधकाम मजूर म्हणा किंवा स्थलांतरीत मजूर म्हणा मात्र, तो तर खरा आधुनिक श्रावण बाळ ठरला आहे. आणीबाणीच्या या काळात त्याने वडिलांना आपल्यावरील बोजा न समजता जबाबदारी समजलं आणि मुंबईत वडिलांना सोडून न जाता आपल्यासोबत गावी नेण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर शिंदे असं या मजूराचं नाव आहे. ते रोजगार बुडल्याने आपल्या गावाकडे निघाले. सोबत वडील यशवंत शिंदे हेही होते. यशवंत शिंदे 80 वर्षांचे असल्याने त्यांना चालणंही जमत नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर शिंदेंनी आपल्या वडिलांना खांद्यावर घेऊन सुमारे 350 किलोमीटर चालत प्रवास केला. यानंतर आता ते लोक संघर्ष मोर्च्यांच्या प्रमुख प्रतिमा शिंदे यांच्या मदतीने आपल्या वाशिम जिल्ह्यातील मूळ गावी पोहचले आहेत.
ज्ञानेश्वर शिंदे हे वाशिम जिल्ह्यातील खानापूर गावचे आहेत. रोजगारासाठी ते मुंबईत होते. सोबत घरचे आणि जवळचे असे एकूण 35 नातेवाईक होते. सर्वांनी आपल्या 10 मुलांनी सोबत आणलं होतं. मालाड येथे बांधकाम मजूर म्हणून सर्वजण काम करत होते. ज्ञानेश्वर याचे वडील यशवंत हे 80 वर्षांचे आहेत. ते काम करु शकत नाहीत. पण त्यांना गावी बघणार कुणी नाही म्हणून त्यांनी वडिलांना आपल्या सोबत ठेवलं होतं. मात्र, मुंबईत लॉकडाऊन सुरू झाला. रोजगार बुडाल्यावर मग आता काय करायचं असा प्रश्न या मजुरांसमोर उभा राहिला. सर्वांनी मग गावी जायचा निर्णय घेतला.
गाड्या बंद असल्याने अखेर त्यांनी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी मग 80 वर्षांचे वडील चालत इतका प्रवास करुच शकत नाही, हे लक्षात आलं. त्यामुळे ज्ञानेश्वर यांनी वडील यशवंत यांना आपल्या खांद्यावर बसवलं आणि प्रवास सुरु केला. सुमारे 350 किलोमीटरचा चालत प्रवास करून हे सर्व धुळे येथे पोहचले. या मजुरांची पायपीट लोक संघर्ष मोर्च्यांचे कार्यकर्ते सचिन धांडे यांनी पाहिली. यानंतर ते या मजुरांच्या मदतीसाठी धावून गेले. अखेर त्यांनी या मजूरांना त्यांच्या वाशिम जिल्ह्यातील मूळ गावी सुखरुप पोहचवलं. या घटनेनंतर मजुरांचा भयावह प्रश्न समोर आल्याचं मत लोकसंघर्ष मोर्च्यांच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या :
CORONA BCG vaccine | देशातील पहिली बीसीजी लस चाचणी पुण्यात, ससून रुग्णालयाला मान्यता
परप्रांतियांचे परतण्यासाठी लोंढे, कसारा घाट हाऊसफुल्ल, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबईने पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही, राजस्थानी संघटनेची भूमिका
Washim Labour walk with father on shoulder