Pune Land Slide : पुणे-महाड मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळली, एक गंभीर जखमी
अरुण उंब्रटकर यांचं घाटातील वाघजाई मंदिराशेजारी भजी, वडापावचं दुकानं होतं. दुपारच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग अरुण यांच्या दुकानावर कोसळला. यामुळं अरुण हे त्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच महाडची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखलं झाली आणि जवळपास दीड तासांनी दरडीखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आलं.
पुणे : महाड मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ एका दुकानावर दरड कोसळल्या (Land Slide)ची घटना घडली आहे. यात दरडीखाली अडकून एक जण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. अरुण गणपत उंब्रटकर असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. महाडच्या रेस्क्यू टीम (Rescue Team)च्या मदतीने तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर जखमी तरुणाला वाचविण्यात यश आलंय. जखमीला उपचारासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दरड कोसळतानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या अपघातात दुकानाचे नुकसान झाले आहे.
दीड तासांनी दरडीखाली अडकलेल्या तरुणाची सुटका
अरुण उंब्रटकर यांचं घाटातील वाघजाई मंदिराशेजारी भजी, वडापावचं दुकानं होतं. दुपारच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग अरुण यांच्या दुकानावर कोसळला. यामुळं अरुण हे त्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच महाडची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखलं झाली आणि जवळपास दीड तासांनी दरडीखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीनं महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखलं करण्यात आलं.
सुदैवाने दुकानात कुणी पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला
पावसाळ्यात अनेक पर्यटक वर्षा विहारासाठी वरंध घाटात गर्दी करत असतात. वाघजाई मंदिर परिसरातून वरंध घाटाचे विलोभनीय दृश्य दिसत असल्यानं या भागात पर्यटक थांबतात. त्यामुळं या परिसरात स्थानिक नागरिकांनी उपाजिविकेसाठी भजी, वडापावची दुकानं लावली आहेत. वाघजाई मंदिराला लागूनच असलेल्या अरुण यांच्या दुकानावर ही दरडी कोसळ्याची घटना घडली. सुदैवाने दुकानात अरुण यांच्याशिवाय कोणताही पर्यटक नसल्यानं मोठा अनर्थ टळला.
गेल्या वर्षा वरंध घाटात दरड कोसळल्याच्या 30 घटना
घटनेची माहिती मिळताच भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उद्धव गायकवाड यांच्यासह भोर आणि महाड तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान मागच्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये, वरंध घाटात जवळपास 30 ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना घडल्या होत्या. यंदाही दरडी कोसळण्याचा धोका अधिक असल्यानं स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. (Land Slide in Warandh Ghat on Pune-Mahad road, one seriously injured)