गौतमीच्या नृत्यातील अश्लीलपणाच्या मुद्यावर प्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटीलचं स्पष्ट मत, ‘माझ्या आणि…’
नृत्यांगना सायली पाटीलचा नुकताच सोलापुरात मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान ती गौतमी पाटीलविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. गौतमी पाटीलच्या नृत्याबाबत अनेकांकडून आक्षेप घेतला जातो.

सोलापूरमधील माढा इथल्या केवड गावात भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने प्रख्यात नृत्यांगना सायली पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सायली पाटीलच्या या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. तिच्या कार्यक्रमाच्या स्टेजचा नारळ फोडायला केवड गावातील एका चाहत्याने 11 हजार रुपये मोजले आहेत. चाहत्याने घोड्यावरुन एण्ट्री करत सायलीच्या कार्यक्रमाचा नारळ फोडला आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सायलीने गौतमी पाटीलच्या नृत्याविषयीही प्रतिक्रिया दिली. ‘नऊ चांगली काम करा आणि त्यातलं एक चुकलं की लोक बाकीची नऊ कामं विसरतात आणि एकालाच धरून बसतात. असंच काहीसं गौतमीच्या बाबतीत झालंय’, असं ती म्हणाली.
“गौतमी पाटीलच्या नृत्यामध्ये कोणताही अश्लील प्रकार नसतो. माझ्या नृत्यातही कसलाही अश्लीलपणा नसतो. आम्ही तसं काही करत नाही. नऊ चांगली कामं करा, पण एक चुकलं की लोकं नऊ कामं विसरतात आणि एकालाच धरून बसतात. असाच प्रकार गौतमीच्या बाबतीत झाला आहे. लोकांना बॉलिवूडमध्ये सर्रास उघडं चालतं. हे महाराष्ट्रातच येतं ना? मराठी सिनेसृष्टीविषयीदेखील काही बोलायला नको, अशा गोष्टी होतात. आम्ही नृत्यकलेच थोडाफार बदल केलाय. काळानुसार लोकांनी आपले विचार बदलायला हवेत”, असं सायली म्हणाली.




View this post on Instagram
नृत्यकलेतील बदल आणि गौतमीविषयी सायलीने मोकळेपणे मतं मांडली आहेत. ती पुढे म्हणाली, “नृत्यकलेत पाटील नावाचं ब्रँड नाही. मी तर या क्षेत्रात येण्याआधीपासून पाटील आडनाव लावलेलं आहे. मला दुसऱ्या नृत्यांगना पाटील आहेत की नाहीत हे माहीत नाही. काळानुसार आपल्याला बदल करावा लागतो. यापूर्वी आपण धोतर वापरत होतो. आता नाही ना वापरत. जसा तुम्ही बदल केलात, तसा आम्ही केलाय. गौतमी मुळेच नृत्यकलेच्या क्षेत्रात सर्व बदल घडले आहेत. आम्हाला सन्मानाची वागणूक मिळत आहे. आधी आम्हाला स्टेजवरच बसून जेवण करायला लागायचं. तिथंच मागे कपडे बदलायला लागायचे. पण आता हे सर्व बदललं आहे. आम्हाला सेलिब्रेटीसारखी वागणूक मिळेय. हे सर्व फक्त गौतमीमुळेच शक्य झालंय.”