नागपूरमध्ये काँग्रेस एक पाऊल मागे, महाविकास आघाडीचं मनोमिलन, बिघाडीच्या चर्चांना फुलस्टॉप?
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत जागावाटप झाली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली
मुंबई : विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक (MLC election) जाहीर झालीय. यामध्ये नाशिक (Nashik), अमरावती (Amravati) या दोन पदवीधरच्या जागांचा आणि औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) आणि कोकण (Konkan) शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या जागेसाठी आग्रही होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु होती. कारण महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीवरुन मनभेद असल्याची चर्चा होती. पण या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न तीनही पक्षांकडून करण्यात आलाय. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत जागावाटप झाली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर महत्त्वाची माहिती दिली. “महाविकास आघाडीकडून अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर मराठवाड्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरेल. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय, तर नागपूरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी देण्यात आलीय. ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज भरलाय”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
“अमरावती, नाशिक येथे काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. अमरावती आणि इतर मतदारसंघात अर्ज दाखल केले जातील. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या जागेसाठी एकमताने निर्णय झालाय. शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. इतर कुणी अर्ज भरलाय त्यांच्याशी चर्चा केली जाईल. या निवडणुकीला एकमताने जाण्याचे काम केलं जाईल. आमचं सर्वांचं एकमत झालंय”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
“नागपूरच्या जागेसाठी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी भूमिक मांडली होती. काँग्रेस त्याठिकाणी अर्ज भरणार नाही. त्या व्यतिरिक्त तिथे जे अर्ज भरणार आहेत त्यांचंही एकमत केलं जाईल”, असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाई, अनेक प्रश्न आहे. जागा वाटप हा प्रश्न महत्त्वाचा नाहीय. आम्ही एकमताने या सत्तेला थांबविण्यासाठी निर्णय घेतला आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
“हुकूमशाहीने एकमताने लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही लढाई आहे. त्यासाठी आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. पाचही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा प्रयत्न करु”, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, नागपूरमधून ठाकरे गटाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचं आता निश्चित झालंय.