महाविकास आघाडीची मोठी खेळी, निकालाआधीच आकड्यांचा ‘असा’ गेम करणार! पडद्यामागे मोठ्या हालचाली
महाविकास आघाडीच्या गोटातून अतिशय महत्त्वाची माहिती येत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, अपक्ष आणि बंडखोर उमेदवार या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांकडून मोठा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभेसाठी प्रचाराचा धुराळा उडताना बघायला मिळाला होता. पण आता प्रचार होत नसला तरी पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या गोटातून तर प्रचंड घडामोडी सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत सत्ता स्थापन केली तरी आपण त्यांच्यासोबत असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिंदे गटातही काहीतरी शिजतंय, असा अंदाज आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागलेला बघायला मिळतोय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटातून अतिशय महत्त्वाची माहिती येत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, अपक्ष आणि बंडखोर उमेदवार या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांना आश्रय देण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे बंडखोर उमेदवार विजयी होऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील हे बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर येत आहे. अपक्ष आणि बंडखोर विजयी होऊ शकतील अशा उमेदवरांवर पुढच्या सरकारची मदत घ्यावी लागू शकते म्हणून सर्व राजकीय पक्षांकडून ही चाचपणी करण्यात येत आहे
सोलापुरात बंडखोर उमेदवाराकडून खंत व्यक्त
दरम्यान, सोलापुरात मोठा गेम झाला आहे. सोलापुरात काँग्रेसने ऐनवेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे ठाकरे गट आक्रमक झालाय. असं असताना काँग्रेसच्या ऐनवेळी दिलेल्या पाठिंब्यानंतर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांच्याकडूनही खंत व्यक्त करण्यात आली आहे. मी महाविकास आघाडीतून इच्छुक होतो. पण मला ऐनवेळी तिकीट दिलं नाही. प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलेलं होतं, पण त्यांनी उशिरा म्हणजे काल पाठिंबा जाहीर केला. त्यांनी जर 8 दिवस आधीच पाठिंबा जाहीर केला असता तर कदाचित आणखी चांगले झाले असते, अशी खंत धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटाकडून ज्या पद्धतीने टीका करण्यात येतेय किंवा आंदोलन होतंय हे बरोबर नाही, अशा पद्धतीने टीका करने संस्कृतीला धरून नाही. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “आजपर्यंत मी राजकारणापासून दोन हात दूर राहिलो होतो. मात्र भाजपने मागच्या काळात जी परिस्थिती निर्माण केली, कारखान्याच्या संदर्भात जे राजकारण केले त्यामुळे मला राजकारणात यावं लागलं”, असं धर्मराज काडादी म्हणाले.