अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता कोण ? लोक म्हणतात फक्त दादा, अजित पवार यांना 42 टक्के लोकांची पसंती !
सर्व नेतेमंडळींमध्ये अजित पवार यांनाच जनतेने सर्वात जास्त पसंदी दिल्याचं दिसतंय. टीव्ही 9 मराठीच्या पोलनुसार या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी जनतेच्या मनावर सर्वात प्रभावी नेता म्हणून आपली पाडली आहे.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2021) आज अखेरचा दिवस होता. पाच दिवसांच्या या अधिवेशनात राज्यातील वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा झाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. तर विरोधकांनी उपस्थितीत केलेल्या प्रत्येक प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी तेवढ्याच तीव्रतेने उत्तरं दिली. या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच सभाग्रहाच्या पटलावर महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था तसेच अन्य महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणांची महाराष्ट्रभर वाहवा झाली. मात्र या सर्व नेतेमंडळींमध्ये अजित पवार यांनाच जनतेने सर्वात जास्त पसंदी दिल्याचं दिसतंय. टीव्ही 9 मराठीच्या पोलनुसार या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी जनतेच्या मनावर सर्वात प्रभावी नेता म्हणून आपली पाडली आहे.
जनतेच्या मनात दादा, अजित पवार सर्वात प्रभावी
टीव्ही 9 मराठीने एक पोल घेऊन यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कोणता नेते प्रभावशाली वाटला याबाबत जनतेला विचारले होते. या पोलला महाराष्ट्रातील जनेतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. राज्यातील 42 टक्के जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाचे अधिवेशन गाजवले असे वाटते. अजित पवार हे सर्वात प्रभावी असल्याचं मत 42 टक्के जनतेचं आहे. तर दुसरीकडे 33 टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस सर्वात प्रभावी वाटले आहेत. त्या खालोखाल भास्कर जाधव यांना लोकांनी पसंदी दिली आहे. सत्ताधारी बाकावर बसलेले अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपद, विधिमंडळातील सर्व सदस्यांचा आदर, तसेच सभागृहाची गरिमा याबद्दल बोलत सर्वांनी जबाबदारीने वागण्याचा सल्ला आमदार, मंत्र्यांना दिला. तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तेवढ्याच क्षमतेने उत्तरं दिली. अजितदादांच्या याच भूमिकेमुळे महाराष्ट्रातील जनता प्रभावित झालेली दिसत आहे. राज्यातील 42 टक्के लोकांना अजित पवार हेच यावेळी सर्वात प्रभावी वाटले आहेत.
फडणवीसांनीदेखील अधिवेशन गाजवलं
तर दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेले देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वैचारिक पातली न सोडता राज्यातील समस्या तसेच कायदा व सुव्यस्था याबाबत राज्य सरकारला जाब विचारला. त्यांनी सभागृहात महिला अत्याचाराची आकडेवारी तसेच सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार या प्रश्नाला घेऊन सरकारवर टीकेचे आसूड ओढले. याच कारणामुळे राज्यातील 33 टक्के लोकांना अधिवेशनात देवेंद्र फडणवीस हेच सर्वात प्रभावी असल्याचे वाटले.
भास्कर जाधवांचा 19 टक्के लोकांवर प्रभाव
दरम्यान, सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभागृहात नक्कल केल्यामुळे तेदेखील अधिवेशनाच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. मोदी यांची नक्कल केल्यामुळे भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी जाधव यांना निलंबित करण्यात यावं असंदेखील म्हटलं होतं. तर दुसरीकडे या वादावर स्पष्टीकरण देताना जाधव यांनी खेळलेला शाब्दिक खेळ अधिवेशनाच्या काळात चर्चेचा विषय ठरला होता. याच कारणामुळे राज्यातील 19 टक्के जनतेवर जाधव यांनी प्रभाव टाकला असून तेच अधिवेशनकाळात सर्वात प्रभावी ठरले, असे जनतेला वाटत आहे.
दरम्यान, दोन टक्के जनतेवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभाव टाकला आहे. तर दुसरीकडे पाच टक्के जनतेला जोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांची भूमिका आवडल्याचं टिव्ही 9 मराठीच्या पोलमधून दिसतंय.
इतर बातम्या :