Maharashtra Marathi Breaking News Live : शिवसेनच्या (शिंदे गट) मंत्र्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल

| Updated on: Jan 05, 2024 | 7:08 AM

Maharashtra Breaking News Live Updates : आज 4 जानेवारी 2024 देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Marathi Breaking News Live : शिवसेनच्या (शिंदे गट) मंत्र्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल

मुंबई, दि. 4 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य केल्यानंतर विरोधकांबरोबर स्वपक्षाकडूनही ते अडचणीत आले आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांनी घरचा आहेर दिला आहे. मुंबई, ठाण्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण, डोंबिवलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणेनंतर कल्याण डोंबिवलीत स्वच्छता अभियान राबवणार आहे. यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जमिनीत फारसा ओलावा राहिला नाही. यामुळे रब्बी हंगामात हरभरा पेरणीच्या क्षेत्रात घट झाली आहे. पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टर पैकी एक लाख ३८ हजार ५७४ हेक्टर म्हणजेच ७६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरही अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भातील बैठक निष्फळ ठरली आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jan 2024 08:12 PM (IST)

    लाल परीवर अयोध्या आणि प्रभू श्रीरामचंद्र यांचे चित्र लावा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

    मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस म्हणजे लाल परीवर अयोध्या आणि प्रभू श्रीरामचंद्र यांचे चित्र लावा अशी मागणी एसटी कष्टकरी जनसंघातर्फे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची त्यांनी शिष्टमंडळासोबत भेट घेतली त्यावेळी ही मागणी करण्यात आली.

  • 04 Jan 2024 07:55 PM (IST)

    शिवसेना फोडण्यासाठी, चिन्ह चोरण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला, ठाकरे गटाच्या आमदाराची टीका

    सिंधुदुर्ग : शिंदे गट आणि भाजपच्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत होतील हे निश्चित झाले आहे. शिंदे गटाने शिवसेना फोडल्यानंतर शिंदे गटाचे तिथे अस्तित्व काय आहे ते आज नितेश राणे यांनी सांगितले आहे. शिवसेना फोडण्यासाठी, चिन्ह चोरण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली.

  • 04 Jan 2024 07:43 PM (IST)

    शिवसेनच्या (शिंदे गट) मंत्र्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल

    औरंगाबाद : शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तर यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या रुपाली मोरेल्लू यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. लाठीचार्ज आणि अश्लील शब्द वापरल्यामुळे सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रुपाली मोरेल्लू यांनी केली.

  • 04 Jan 2024 07:32 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचे ‘मगरमच्छ के आंसू’, मंत्री गिरीश महाजन यांची टीका

    मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे.. त्यांच्या पगारात 20 टक्के पगारवाढ आम्ही केली. यात आणखी पगारवाढ करावी, त्याचसोबत पेन्शन, एलआयसी, ग्रॅच्यटी असे अनेक विषय आहेत. या विषयाबाबत सरकार सकारात्मक आहे. त्याचीही गोड बातमी लवकरच मिळेल. सरकारच्यावतीने आम्ही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. पण, काल इथे जे येऊन गेले त्यांनी अडीच वर्षात काय केलं? काल ते ‘मगरमच्छ के आंसू’ काढत होते. सत्ता गेल्याने पवार -ठाकरे अस्वस्थ झालेत अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.

  • 04 Jan 2024 07:27 PM (IST)

    रुपाली चाकणकर यांनी केली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

    पुणे : साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डीमधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात. त्या ठिकाणी दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम केले आहे. मागे पोपटपंची करताना हेच महाशय म्हणाले होते “हे वर्ष दंगलींचं वर्ष असेल.” त्या वाक्याला खरं करण्यासाठी तर हा आटापिटा सुरू नाही ना? अशी टीका राष्ट्रवादी (अजितदादा गट) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलीय.

  • 04 Jan 2024 07:21 PM (IST)

    शिवडी न्हावाशेवा लिंक रोडच्या टोलवरून सचिन अहिर यांचा टोला

    मुंबई : शिवडी न्हावाशेवा लिंक रोडच्या टोलवरून ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी राज्यससरकारला टोला लगावलाय. याचे काय चालले ते यांनाच समजत नाही. आधी टोल ५०० रुपये होता. आता तोच टोल २५० रुपये केला. सरकारमध्ये जे आहेत त्यांनी टोलमुक्तची घोषणा केली. मग आता टोल का? असा टोला अहिर यांनी लगावला. रेसकोर्स आणि कोस्टल रोडचे जे दर आकारले जात आहेत ते जास्त आहेत असेही ते म्हणाले.

  • 04 Jan 2024 07:06 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा भास्कर जाधव यांच्याकडून निषेध

    चिपळूण | ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी जितेंद्र आव्हाड यांनी रामाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच असं विधान करताना काय परिणाम होतील, याचा विचार करायला हवा, असा सल्लाही भास्कर जाधव यांनी दिला. “जबाबदार माणसाने नेहमी जबादारीने वागलं पाहिजे. रामाच्या नावानं वक्तव्य केल्यामुळे वेळोवेळी अशांतता निर्माण केली गेली आहे. लोकांनी वक्तव्याबाबत दूरगामी परिणाम वक्तव्याचे होतील याचा विचार केला पाहिजे. आव्हाडांच्या वक्तव्याचा केवळ निषेधच नाही तर आपण धिक्कार करतो. वक्तव्याचा फायदा या देशात कोण कोण कशा पद्धतीने करतो याचा विचार वक्तव्य करणाऱ्यांन केला पाहिजे”, असं भास्कर जाधव म्हणाले.

  • 04 Jan 2024 06:37 PM (IST)

    काँग्रेस पक्षाची आज पार पडली बैठक

    नवी दिल्ली | राजधानी नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक पार पडली. 9 राज्यांच्या जागा वाटप बाबत अहवाल तयार झाल्याचं समजतंय. तसेच हा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे दिला जाणार आहे. काँग्रेसचे वरीष्ठ नेते आजच अहवाल सादर करणार आहेत. महाराष्ट्रसह 9 राज्यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 04 Jan 2024 06:17 PM (IST)

    Manoj Jarange Patil | आमच्या बांधवांना नोटीस का देता? जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल

    जालना | मराठा आणि कुणबी एकच असल्याचे सिद्ध झालं आहे. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेवून कायदा पारित करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच आम्ही शांततेत मुंबईला आंदोलनला जातोय. तर आमच्या बांधवांना नोटीस का देताय, असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच आम्हाला आडवल्यास आमच्या माता माऊली आमदार आणि मंत्र्यांच्या घराला वेढा टाकणा, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील जालन्यातील गोरी येथे बोलत होते.

  • 04 Jan 2024 05:52 PM (IST)

    अशोक गेहलोत यांनी राम मंदिराचे श्रेय काँग्रेस आणि राजीव गांधी यांना दिलं

    काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी राम मंदिराचे श्रेय काँग्रेस आणि राजीव गांधी यांना दिलं आहे. राम मंदिराचे कुलूप कोणी उघडले, पायाभरणी कोणी केली? हे राजीव गांधींनी केले, हे भाजपला विचारावे, असे ते म्हणाले. तो एक मोठा मुद्दा बनला होता, ही वेगळी गोष्ट आहे, ज्यावर विहिंपने पुढाकार घेतला.

  • 04 Jan 2024 05:45 PM (IST)

    पंतप्रधानांवर भाष्य केल्याप्रकरणी पवन खेडा यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

    काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांच्यावर पंतप्रधान आणि त्यांच्या वडिलांच्या नावाबाबत अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आता खेडा यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला खेडा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

  • 04 Jan 2024 05:35 PM (IST)

    आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा अविभाज्य भाग: जयराम रमेश

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी जाहीर केले की आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा अविभाज्य भाग आहे. बैठकीनंतर माहिती देताना जयराम रमेश म्हणाले की, भारत न्याय यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. हा प्रवास जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी आहे.

  • 04 Jan 2024 05:20 PM (IST)

    दिव्या हत्याकांडात वापरलेली बीएमडब्ल्यू कार पटियाला बसस्थानकात सापडली

    गुरुग्राममधील दिव्या हत्याकांडात वापरलेली बीएमडब्ल्यू कार पटियाला बसस्थानकावरून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील फरार असलेला बलराज हा मोहालीचा रहिवासी आहे, तर रवी हिसारचा रहिवासी आहे. हे दोघेही बीएमडब्ल्यू कारमध्ये दिव्यांचा मृतदेह घेऊन निघाले होते.

  • 04 Jan 2024 05:11 PM (IST)

    भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 विकेट राखून केलं पराभूत

    भारताने दक्षिण अफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 गडी राखून पराभूत केलं. मालिका बरोबरीत सोडवल्याने टीम इंडियाला फायदा झाला आहे.

  • 04 Jan 2024 05:00 PM (IST)

    आयोगाने 7 दिवसात मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं- मागासवर्ग आयोगाला निर्देश

    मराठा सर्वेक्षणाबाबत शासनाचे मागासवर्ग आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. आयोगाने 7 दिवसात मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करावं. शासनाने रितसर जीआर काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांमार्फतच होणार सर्वेक्षण होणार आहे. जिल्हास्तरावर नियुक्त नोडल अधिकारी होणार असून गोखले इनस्टिट्यूट मार्फत सॉफ्टवेयर तयार होत आहे. कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणाचे प्रशिक्षण मिळणार आहे.

  • 04 Jan 2024 04:45 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड हे दुष्ट प्रवृत्तीचे नेते- अयोध्येच्या महाराजांची टीका

    अयोध्याचे महाराज श्री. आचार्य पुरुषोत्तम दास, रामलल्ला सरकारची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे दुष्ट प्रवृत्तीचे नेते , भगवान श्रीरामाबद्दल त्यांनी केलेल्या विधानासाठी रामभक्त त्यांना माफ करणार नाही. तेंद्र आव्हाड श्रीरामाचे दर्शन करा तुमची बुद्धी शुद्ध होईल असा लगावला टोलाही त्यांना आव्हाडांना लगावला.

  • 04 Jan 2024 04:37 PM (IST)

    सरकारने जरांगेंना दिलेला शब्द पाळला नाही- शरद पवार

    राज्य सरकारने सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा जरांगेंना दिलेला शब्द पाळला नाही. त्यासोबतच फडणवीसांनी धनगरांच्या मेळाव्यात आरक्षण देऊ असं सांगितलं होतं- शरद पवार

  • 04 Jan 2024 04:35 PM (IST)

    देशात शेतकऱ्यांची अवस्था चिंता करण्यासारखी- शरद पवार

    शेतकऱ्यांची अवस्था चिंता करण्यासारखी आहे. साखर, सोयाबीन कांद्याचे दर कमी झाले. देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासोबतच बेरोजगारीही दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

  • 04 Jan 2024 04:25 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी खोटी- शरद पवार

    पक्की घर देणार मोदींची घोषणा हवेत विरली, गॅरंटी गॅरंटी म्हणतात पण त्यांची गॅरंटी खोटी आहे, अनेकांना याचा प्रत्यय आल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

  • 04 Jan 2024 04:18 PM (IST)

    400 जागा जिंकू असं सातत्याने सांगितलं जातं- शरद पवार

    देशात अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. 400 जागा जिंकू असं सातत्याने सांगितलं जातं. अनेक राज्यात सत्ता नसतानाही ते 400 जागा कसे जिंकणार आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

  • 04 Jan 2024 04:15 PM (IST)

    काँग्रेसच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी

    महाराष्ट्रात भाजपचा पराभव करण्याची शक्ती असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी मिळणार  आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस ताकदीने लढणार तर काँग्रेस परंपरागत जागांवर दावा करणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी राज्यातील काँग्रेस जागांसंदर्भात एक ते दोन दिवसात घेणार निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. आजच्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचा लेखाजोखा राष्ट्रीय अध्यक्षांसमोर मांडल.

  • 04 Jan 2024 03:54 PM (IST)

    महाराष्ट्र जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची प्राथमिक चर्चा

    नवी दिल्ली : महाराष्ट्र जागा वाटपासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी प्राथमिक माहिती खर्गे यांच्यासमोर ठेवली. काँग्रेस पक्षाला किती जागा हव्यात याची माहिती थोरात आणि पटोले यांनी खर्गे यांना दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 04 Jan 2024 03:39 PM (IST)

    कापूस खरेदी बाजार समितीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको

    परभणी – कापूस खरेदी बाजार समितीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला आहे. परभणीच्या सेलू येथे कापूस घेऊन बाजार समितीत गेलेल्या शेतकऱ्यांना व्यापारी बाहेर खाजगी मध्ये कापूस विक्री करायला बळजबरी करत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जवळपास अर्धा तास शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरला. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची समजूत काढल्या नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

  • 04 Jan 2024 03:19 PM (IST)

    कुणाच्याही भावना दुखावतील असे वक्तव्य करु नये – नाना पटोले

    कुणाच्याही भावना दुखावतील असे वक्तव्य करु नये असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. जिंतेंद्र आव्हाड यांनी काल श्री रामांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

  • 04 Jan 2024 03:15 PM (IST)

    धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

    प्रभू श्री रामाविषयी आक्षेपार्य विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन धुळ्यात सुरु आहे. शिवसेनेकडून आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने त्यांचा निषेध. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत वक्तव्य आहे का शिंदे गटाचा सवाल. शहरातील शिवतीर्थ चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन.

  • 04 Jan 2024 02:51 PM (IST)

    भाजपाच्या महिला आघाडीची आव्हाड यांच्याविरोधात घोषणाबाजी

    भाजपच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या घरी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जितेंद्र आव्हाड हाय हायच्या अशा घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

  • 04 Jan 2024 02:37 PM (IST)

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची 6 जानेवारी रोजी बैठक

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची नवी दिल्लीत शनिवारी सायंकाळी 5 वाजता एक महत्वाची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राम मंदिर प्रचारासह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 04 Jan 2024 02:35 PM (IST)

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची 6 जानेवारी रोजी बैठक

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची नवी दिल्लीत शनिवारी सायंकाळी 5 वाजता एक महत्वाची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राम मंदिर प्रचारासह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 04 Jan 2024 02:21 PM (IST)

    रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी भाजपाची देशभर स्वच्छता मोहीम

    राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेआधी भाजपाची देशभरातील तीर्थस्थळांच्या जागी स्वच्छता अभियान राबविण्याची योजना आहे. 14 ते 22 जानेवारी हे स्वच्छता अभियान राबविणार आहे.

  • 04 Jan 2024 01:55 PM (IST)

    जरांगे पाटील अंबड तालुका दाैऱ्यावर

    जरांगे पाटील यांचा दौरा आता अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव पोहचला आहे. यावेळी जरांगे पाटील यांचे गावकऱ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येत आहे. प्रत्येक गावात गेल्यानंतर आरक्षण कसे गरजेचे आहे आणि 20 तारखेला मुंबई कसे हे समजून सांगत आहेत.

  • 04 Jan 2024 01:39 PM (IST)

    नवनीत राणा यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

    जितेंद्र आव्हाड यांना जवळच असलेल्या आग्रा येथे पाठवलं पाहिजे. नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी आभार मानतो; आम्हाला विरोध करणारेच आता म्हणतात की नवनीत याच योग्य उमेदवार आहेत, असे नवनीत राणा यांनी म्हटले.

  • 04 Jan 2024 01:21 PM (IST)

    संजय पवार यांचे मोठे विधान

    जिल्हा प्रमुख नियुक्त करणे किंवा रद्द करणे हे सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत. 18- 19 वर्ष त्यांनी शिवसेनेसाठी चांगले काम केल हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, असे संजय पवार यांनी म्हटले आहे.

  • 04 Jan 2024 01:06 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटाचे 27 जानेवारीला कोल्हापुरात राज्यस्तरीय अधिवेशन

    अधिवेशनाला पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार चर्चा. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती.

  • 04 Jan 2024 12:50 PM (IST)

    Maharashtra News : रोहित पवारांना मी फारसं महत्त्व देत नाही- जितेंद्र आव्हाड

    जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना घरचा आहेर दिला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर मी रोहित पवारांना फारसं महत्त्व देत नाही, ही त्यांची पहिलीच टर्म आहे असं आव्हाड म्हणाले.

  • 04 Jan 2024 12:41 PM (IST)

    Maharashtra News : तुम्हाला तुमचा राम निवडणूकीच्या रिंगणात आणायचा आहे- जितेंद्र आव्हाड

    तुम्हाला तुमचा राम निवडणूकीच्या रिंगणात आणायचा आहे. आमचा राम आमच्या ह्रदयात आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. राम हे 14 वर्ष वनवासात होते ते बहूजणांचे होते. राम हे क्षत्रिय होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 04 Jan 2024 12:28 PM (IST)

    Maharashtra News : वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खेद व्यक्त

    आपल्याकडे भावनांना जास्त महत्त्व आहे. माझ्या कालच्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. असं शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 04 Jan 2024 12:20 PM (IST)

    Maharashtra News : मी कुठलही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- आव्हाड

    श्री राम मांसाहरी होते असं वक्तव्य केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना टिकेचे धनी व्हावे लागत आहे. सध्या त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी कुठलेली वक्तव्य अभ्यासाशिवाय करत नाही असं आव्हाड म्हणाले. यासाठी त्यांनी काही संदर्भदेखील दिले.

  • 04 Jan 2024 12:13 PM (IST)

    Maharashtra News : काल जे मी बोललो ते ओघात बोललो- जितेंद्र आव्हाड

    काल जे मी बोललो ते ओघात बोललो असं जितेंद्र आव्हाड त्यांच्या कालच्या वक्तव्यावर म्हणाले. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. रामासंबंधात वाद मला वाढवायचा नाही असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

  • 04 Jan 2024 12:07 PM (IST)

    Jitendra Avhad : जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद, श्री रामाच्या वक्तव्यावर देणार प्रतिक्रीया

    श्री राम मांसाहरी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्थरातून टिका होत आहे. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी ते आज पत्रकार परिषद घेत आहेत.

  • 04 Jan 2024 11:50 AM (IST)

    जितेंद्र आव्हाडांविरोधात FIR नोंदवण्यासाठी राम कदम यांच्याकडून तक्रार दाखल

    मुंबई- भाजप नेते राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल वक्तव्य केलं होतं. ते मांसाहारी असल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलंय.

  • 04 Jan 2024 11:40 AM (IST)

    जितेंद्र आव्हाडांवर कारवाई केली नाही तर मी त्यांना ठार मारेन; अयोध्येच्या परमहंस आचार्य यांचा इशारा

    अयोध्या, यूपी: “जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असून ते प्रभू श्रीराम यांच्या भक्तांच्या भावना दुखावणारं आहे. मी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनंती करेन की त्यांनी याची दखल घ्यावी. प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करा. त्यांच्यावर कडक कारवाई झाली नाही, तर जितेंद्र आव्हाड यांना मी ठार मारेन,” असा धमकीवजा इशाराच अयोध्येचे परमहंस आचार्य यांनी दिला आहे.

  • 04 Jan 2024 11:30 AM (IST)

    आंध्रप्रदेशमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला रेड्डी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    आंध्रप्रदेशमध्ये राजकीय भूकंप आला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला रेड्डी यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आंध्रप्रदेशचे प्रभारी मॅनिकम टागोर हे शर्मिला रेड्डी यांचा पक्ष वाईएसआर तेलंगणा पार्टी कॉंग्रेसमध्ये विलय करण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची आई मुलीच्या बाजूनं आहे. वाय. एस. जगनमोहन रेड्डी कारागृहात असताना पक्षाची कमान सांभाळण्याचं काम शर्मिला रेड्डी यांनी केलं आहे. शर्मिला रेड्डी यांना सोबत घेत कॉंग्रेस दक्षिणेत आपले लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसून येतं.

  • 04 Jan 2024 11:20 AM (IST)

    महानंदाच्या जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा- संजय राऊत

    गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचा पगार केला नाही. सरकारकडे त्यांना पगार द्यायला पैसेच नाहीत. जर पैसा आहे तर तो कुठे जातोय. महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांपासून पगार दिला नाही. महानंद व्यवस्थापन विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे 27 एकर जमीन. महानंदाच्या या जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • 04 Jan 2024 11:10 AM (IST)

    नवी दिल्ली- दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद

    नवी दिल्ली- दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पत्रकार परिषद घेणार आहेत. ईडीचे समन्स आणि सीबीआय कारवाईच्या इशाऱ्यानंतर केजरीवाल काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • 04 Jan 2024 11:02 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने मविआ नेते अडचणीत ?

    जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने मविआ नेत्यांची अडचण झाली आहे का , असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं.

  • 04 Jan 2024 10:51 AM (IST)

    नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर

    दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर,  राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज देशातल्या सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक विधिमंडळ पक्षनेतेही बैठकीत सहभागी होणार. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नाना पटोले बैठकीत सहभागी होणार आहेत.

    माझा इतिहासाचा इतका अभ्यास नाही, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

  • 04 Jan 2024 10:37 AM (IST)

    पुण्यात भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन

    पुण्यात भाजप जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक, पुण्यात आंदोलन सुरू आहे. आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.

  • 04 Jan 2024 10:28 AM (IST)

    श्रीराम मांसाहार करायचे याचा आव्हाडांनी पुरावा द्यावा, राम कदम आक्रमक

    श्रीराम मांसाहार करायचे याचा आव्हाडांनी पुरावा द्यावा असे राम कदम यांनी म्हटले आहे. आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का, असा सवालही राम कदम यांन उपस्थित केला आहे.

    राम कदम हे आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.

  • 04 Jan 2024 10:19 AM (IST)

    मुंबईत धुक्यामध्ये मोठी वाढ, हवेची गुणवत्ताही खालावली

    मुंबईत कालपासून धुक्यामध्ये मोठी वाढ झाली असून हवेची गुणवत्ताही खालावली आहे. मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे.

  • 04 Jan 2024 10:05 AM (IST)

    पुणे – राज्य मागासवर्ग आयोगाची आज होणार बैठक

    राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता सर्किट हाऊसमध्ये ही बैठक पार पडेल. या बैठकीत सर्व्हेक्षणाच्या चाचणीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 04 Jan 2024 09:57 AM (IST)

    इचलकरंजीत काँग्रेसला मोठा धक्का

    इचलकरंजी शहरात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसची आजी-माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत आजी-माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. इचलकरंजी शहरामध्ये अजितदादा गटाला मोठं पाठबळ मिळताना दिसतंय. सुमारे 50 ते 60 कार्यकर्त्यांनी केला अजितदादा गटातील राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला आहे.

  • 04 Jan 2024 09:45 AM (IST)

    जरांगे पाटील यांच्या 6 व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात

    मनोज जरांगे पाटील यांच्या 6 व्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात झाली आहे. जरांगे पाटील यांच्या 5 दिवसाच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.  गोदावरी नदीकाठावरील गावांचा जरांगे पाटील दौरा करणार  आहेत.  जरांगे पाटील यांच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनात ज्या गावांनी त्यांना साथ आणि सहकार्य केले त्या गावांच्या भेटी घेणार आहेत. आज अंबड तालुक्यातील बहुतेक गावचा या दौऱ्यात समावेश आहे.  आपेगाव, बळेगाव, साष्ट पिंपळगाव, डोमलगाव, गोरी- गांधारी, शहागड, वाळकेश्वर, नागझरी, कुरण, पाथरवाला, हिंगणगाव, गोंदी, कठोळा, हसनापूर, साडेगाव या गावांना देणार जरांगे पाटील भेटी देणार आहेत.

  • 04 Jan 2024 09:15 AM (IST)

    मनोज जरांगे म्हणाले…

    गोदा पट्टयातील 23 गावांना भेटी देत आहे.  या गावांनी आतापर्यंतच्या उठवात भेटी देणार आहे.  आरक्षण विषयात समाजाशी चर्चा करणार आहे. मराठवाड्यातील सर्व मराठे 20 तारखेला मुंबई जाण्यासाठी अंतरवालीमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहेत कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ही साथ द्यावी, असं मनोज जरांगे म्हणाले.

  • 04 Jan 2024 09:01 AM (IST)

    Manoj jarange patil | ‘भुजबळ राजकारणासाठी समाजाचा वापर करतो’

    “मराठ्यांनी घरी न बसता बाहेर पडावे. भुजबळ हा राजकारणी माणूस आहे आणि तो राजकारणासाठी समाजाचा वापर करतो. हा केसेस सोडवण्यासाठी फायदा घेत आहे. सामान्य ओबीसी आणि मराठ्यांना कळत आहे, याच्यामुळे आपसात नाराज होऊ नका. भुजबळ हा विचित्र माणूस. भुजबळ हे धनगर आणि वंजारी बांधवांचा फायदा घेत आहे” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

  • 04 Jan 2024 08:53 AM (IST)

    Shivsena | ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची पदावरून हकालपट्टी

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावरून मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी. नव्या जिल्हाप्रमुखपदी वैभव उगले आणि संजय चौगुले यांची नियुक्ती. जिल्हाप्रमुख बदलावर मुरलीधर जाधव गट नाराज. मुरलीधर जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हातकणंगले लोकसभा मतदार संघात केली होती उमेदवारीची मागणी. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर देखील मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टींवर केली होती जोरदार टीका. राजू शेट्टी यांच्यावरील टीकेनंतर दुसऱ्याच दिवशी मुरलीधर जाधव यांची हकालपट्टी. मुरलीधर जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष

  • 04 Jan 2024 08:30 AM (IST)

    Jitendra Awhad | पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार अर्ज

    हिंदू धर्माच्या देवी-देवतांबद्दल बोलून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार अर्ज. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांचं जाहीर वादग्रस्त वक्तव्य. राम हा शाकाहारी नव्हता. तो मांसाहारी होता. एवढी वर्ष जंगलात राहून कोण शाकाहारी राहतं का? श्रीरामाबद्दल जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य.

  • 04 Jan 2024 08:11 AM (IST)

    Maharashtra news | सुषमा अंधारे यांच्यावर मालेगावात गुन्हा दाखल

    सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल. मालेगावच्या अमन परदेशीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप. भा. द. वि. कलम 295(अ) नुसार गुन्हा दाखल. मालेगावातील अमन परदेशी यांनी केला सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल.

  • 04 Jan 2024 07:58 AM (IST)

    Marathi News | कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी

    केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांना पत्र पाठवून केली आहे.

  • 04 Jan 2024 07:48 AM (IST)

    Marathi News | मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत

    मध्य रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. आटगाव ते टिटवाळा दरम्यान धुके असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल ट्रेन उशिराने धावत आहे. यामुळे पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहे.

  • 04 Jan 2024 07:37 AM (IST)

    Marathi News | रेल्वे अपघातात वाढ

    डोंबिवली ते कोपर स्टेशन दरम्यान रेल्वे अपघातात वाढ झाली आहे. नववर्षाच्या तिसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन पुरुष, दोन महिलांचा समावेश आहे. या अपघातावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपयोजना कराव्या अशी मागणी रेल्वे संघटनेने केली आहे.

  • 04 Jan 2024 07:23 AM (IST)

    Marathi News | मुख्यमंत्री आता कल्याणाकडे लक्ष देणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आता कल्याण डोंबिवलीवर असणार आहे. मुख्यमंत्री लवकरच मुंबई, ठाणे शहरानंतर कल्याण डोंबिवलीत स्वच्छता मोहीम राबवणार आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत पूर्ण झालेल्या विकास कामांचे उद्घाटन ही करणार आहेत.

  • 04 Jan 2024 07:11 AM (IST)

    Marathi News | अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम

    मुंबईतील आझाद मैदानात अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही आज अंगणवाडी सेविकांच्या भेटीसाठी आले होते. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंगणवाडी सेविकांमध्ये चर्चा झाली, मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत कोणतेही चांगले पाऊल उचलले गेले नसल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.

Published On - Jan 04,2024 7:02 AM

Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.