मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : गेल्या 15 दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. इस्रायलने गाजातील रुग्णालयावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 500 नागरिक ठार झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज गुहागरमध्ये येणार आहेत. यावेळी ते लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं रात्री 2 वाजता नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
पुणे | पुण्यात एनडीएमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेटचा मृत्यू झालाय. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) प्रशिक्षण घेणारा महाराष्ट्रातील कॅडेट प्रथम महाले यांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान दोन दिवसांपूर्वी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. १६ ऑक्टोबर रोजी इंटर स्कॉड्रन बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान प्रथम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
बारामती | शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. बारामती आणि इंदापूरमध्ये पक्षबांधणीला वेग आला आहे. एस. एन. जगताप यांची बारामती तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंदापूर तालुकाध्यक्षपदाची धुरा तेजसिंह पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी या नियुकत्या केल्या आहेत.
मुंबई | विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 40 ते 50 मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. वर्षा निवासस्थानी ही चर्चा पार पडली. विजय वडेट्टीवार चर्चेनंतर वर्षावरुन निघाले. कंत्राट भरती, ललित पाटील प्रकरण आणि मराठा ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
पुणे | अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्षांकडून पंक्षातर्गत निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. अशाच शरद पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी लवकर जाहीर करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अमोल कोल्हे यांना मतदारसंघात फिरण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लवकर उमेदवारी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शरद पवारांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच तालुकानिहाय आढावा घेतला.
रश्मी ठाकरे हे ठाण्यात स्टंट करण्यासाठी गेल्या होत्या. देवाच्या ठिकाणी दर्शनासाठी यायचे असते. परंतु त्यांनी शक्ती प्रदर्शन केले हे चुकीची आहे. ठाणाच्या महिला आघाडी त्यांच्यासोबत नसल्याने त्यांना बाहेरच्या लोकांना घेऊन आरती करावी लागली, असे मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले आहे.
32 हजार लोकांपैकी 2 ते 5 लोकांनी सोडून नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. मी आपल्याकडे समर्थन मागायला आलोय. सर्वांचे जीवन मंगलमय राहू दे म्हणून देवीकडे प्रार्थना केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास झालाय, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
आमदार संतोष बांगर यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून झापले. पीक विमा इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्याला झापताना आमदार बांगर यांची ऍडिओ क्लीप व्हायरल झालीये.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारात भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीने एका बिल्डरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केलीये. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही कैद झालाय. माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी बिल्डर नरेश पटेल यांना ही मारहाण केलीये.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, “त्यांच्या आश्वासनांची यादी खूप मोठी आहे पण एकही पूर्ण होत नाही. त्यात अनेक प्रकारच्या गोष्टी मिसळून जाहीरनामा बनवणे खूप सोपे आहे.ते त्यात अनेक प्रकारचे आकर्षक मुद्दे टाकत आहेत.पण त्यांनी 15 महिन्यांत मध्य प्रदेशची जी नासधूस केली, त्यानंतर राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा रुग्णालयावरील हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे ते म्हणाले.
पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 4 आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणातील पाचव्या आरोपीला इतर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. मकोका अंतर्गतही सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे. या शिक्षेचा निकाल 26 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
#WATCH मुलुगु (तेलंगाना): कांग्रेस नेता राहुल गांधी और कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा ने कांग्रेस की 'बस विजयभेरी यात्रा' का शुभारंभ किया। pic.twitter.com/8oEF2X7tB3
— ANI_HindiNews (@AHindinews) October 18, 2023
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) तैनात असलेल्या लष्कराच्या जवानाचा संशयास्पद परिस्थितीत गोळी लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी रियासी जिल्ह्यात पूर्ण लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरक्षा दलांनी सांगितले की, रिधम शर्मा (22) हे कर्तव्यावर असताना बालाकोट भागातील सीमावर्ती भागात जखमी अवस्थेत आढळून आले. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
अजित पवार गटातील 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी पक्षात दुफाळी झाल्यानंतर काही आमदार सत्ताधाऱ्यांसोबत तर काही आमदार विरोधी गटात आहेत. दोन्ही गट तेच राष्ट्रवादी असल्याचा दावा करत आहेत. आता दोन्ही गटाकडून आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस दारुचे दुकानं उघडून प्रेमाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला, दारुच्या दुकानातून प्रेमाचे राजकारण होते का असा उलटप्रश्न त्यांनी केला. पंतप्रधान आवास योजना आणि कोविड काळातील व्हॅक्सीन हे काय द्वेषाचे राजकारण करत आहेत का? असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला. छत्तीसगडमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
#WATCH छत्तीसगढ़: असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा ने कहा, “आप(कांग्रेस) शराब की दुकान खोलकर मोहब्बत की राजनीति कीजिए… शराब की दुकान में कभी मोहब्बत की राजनीति होती है क्या? क्या प्रधानमंत्री आवास योजना और वैक्सीन बनाना नफरत की राजनीति है?” pic.twitter.com/bnIedj41Vj
— ANI_HindiNews (@AHindinews) October 18, 2023
ललित पाटील प्रकरणात दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यावर याप्रकरणात आरोप करत आहेत. ललित पाटील याला अटक केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दादा भुसे यांनी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली तर शंभूराज देसाई यांनी अंधारे यांचा आरोप हस्यास्पद असल्याचा दावा केला आहे. त्यांनी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.
मुंबई : ड्रग फ्री महाराष्ट्र ही संकल्पनेमध्ये गेल्या क्राईम कंट्रोल कॉन्फरन्समध्ये आम्ही सांगितलं होत की कंट्रोल केलं पाहिजे. याचे कनेक्शन तोडलं पाहिजे. मुंबई पोलिसांना काही कारखान्याची माहिती मिळाली आणि त्यांनी धाडी टाकल्या. काही गोष्टी मलाही कळल्या आहेत. त्या मी आताच सांगणार नाही. सगळी यूनिट कामाला लागली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यातून एक मोठं कनेक्शन आम्ही बाहेर आणू. अनेक बोलणाऱ्यांची तोंड बंद होणार आहेत असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : ठाकरे गटातील प्रमुख महिला पदाधिकारी मीनाताई कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे यावेळी उपस्थित आहेत. मिनाताई कांबळी या रश्मी ठाकरे यांच्या सर्व दौऱ्याचे नियोजन करत होत्या. महिलांचे मेळावे आणि शिवसेना वाढवण्यात खूप मोठा हातभार आहे. मीनाताई ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे.
ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाका देवीची महाआरती केली. त्याआधी त्यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रश्मी ठाकरे यांच्याश नेते खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. रश्मी ठकारे यांनी देवीची आरती करून ओटी भरली.
मुंबई : शिंदे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागांवर दावा केल्याची माहिती समोर आली होती. शिंदे गटाला 22 जागा दिल्या तर अजित पवार गटाला किती जागा देणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केलंय. कोणीही जागा मागितलेल्या नाहीत. उगीच काहीही आकडा चालवू नका. जागेसंदर्भात आम्ही बसू आणि चर्चा करुन योग्य निर्णय घेवू असे फडणवीस म्हणाले.
खिचडी घोटाळाप्रकरणात ईडीने आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. जंबो कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. प्रकरणात सुरज चव्हाण यांच्या चेंबूरच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ईडी या प्रकरणात सक्रीय झाली आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून छापेमारी सुरु आहे.
अमरावती : शेतीच्या सातबाऱ्याचा फायदा घेत इन्कम टॅक्स भरणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील 26 हजार शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचे 32 कोटी लाटले. जिल्हा प्रशासनाने या सर्व शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या आहेत. जे नोकरदार आहेत पण त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असे खातेदार प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. यातील 2 हजार 132 अपात्र लाभार्थ्यांनी 1 कोटी 69 लाख रुपयांची रक्कम प्रशासनाला परत केलीय.
जळगाव : ललित पाटील चाळीसगावसह देशात कुठेही गेला असेल त्याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करणार असे आदेश गृहमंत्री यांनी दिले आहेत. राजकारण बाजूला ठेवून ललित पाटील सारखी प्रवृत्ती ठेचण्याचं काम गृहमंत्री करत आहे. पोलिसांनी ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या आहेत. तो आता खरे बोलेल. ललित पाटील बोलण्याआधी विरोधकच जास्त बोलताय अशी टीका भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी केली.
टेंभी नाका इथे आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे या ठाण्यामध्ये दाखल. 40 ते 50 गाड्यांच्या ताफा सहित रश्मी ठाकरे आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्या इथल्या देवीच्या दर्शनासाठी रवाना होत आहेत.
अंधेरी महानगरपालिका कार्यालय समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलन. फुटपाथवरील फेरीवाल्यांविरोधात, विभागातील पाणी टंचाई विरोधात आणि अनाधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या भ्रष्ट अधिकारी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलन. “आज आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू”, असे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
मी ललित पाटील यांचा वकील आहे. ललित पाटील यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. ललित पाटील यांना बरंच काही कोर्टाला सांगायचं आहे. सोमवारपर्यंत कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी सुनावली आहे आणि त्यामुळे उद्याच मी जाऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये भेटणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा जबाब मी नोंदवून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. केवळ संशयाच्या आधारावर त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेल्या अशा प्रथमदर्शनी आम्हाला तरी वाटते. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही आमची तयारी करत आहोत
– राहुल कांबळे (ललित पाटील वकील)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंद दाराआड चर्चा झाली असून यावेळी सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवले होते. मतदार संघातील कामासाठी चर्चा झाल्याची विधानसभा अध्यक्षांची माहीती.
महाराष्ट्राचे लोकप्रिय व लोककार्यसम्राट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या जनकल्याणकारी व नागरी विकास कार्यपद्धतीने प्रभावीत होऊन उबाठा गटाचे महत्वाचे पदाधिकारी आज मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत सामिल होणार आहेत.
कल्याणच्या खडकपाडा येथील साई प्यारडाईज इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग. राहणाऱ्या अशोक पाटील यांच्या बंद घरात अचानक लागली आग. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटना स्थळी दाखल
ललीत पाटील याच्या अटकेनंतर त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याचे वकील एड. अमित मिश्रा यांनी न्यायालयात ललीत पाटील याला पुणे पोलिसांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.
आरोपी ललीत पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. त्याच्या ससूनमधून पलायन प्रकरणी तपास सुरु आहे. सर्व दिशेने या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या दिल्लीतील कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे. या कार्यालयाच्या पोस्टरवर केवळ अजित पवार आणि प्रफुल पटेल यांचेच फोटो लावण्यात आले आहेत.
ड्रग माफीया ललित पाटील याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिस त्याला घेऊन अंधेरी कोर्टात पोहचले आहेत. या आधीच ललितने एक खळबळजनक विधान केले आहे,’मी ससूनमधून पळून गेलो नाही, तर मला पळवण्यात आलं होतं’ असं ललित म्हणाला आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीला सुरूवात झालेली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाचा आढावा घेण्यात येत आहे. कोल्हापूर आणि शिरूर मतदारसंघाचा या बैठकीत आढावा घेण्यात येत आहे. याशिवाय सातारा आणि माढा मतदारसंघाचासुद्धा या बैठकित आढावा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सध्या अर्ध पक्ष सत्तेत आणि अर्ध पक्ष बाहेर अशी स्थिती आहे असे राज ठाकरे म्हणाले. राज्यात फक्त चालढकल सुरू आहे अशी टिका राज ठाकरे यांनी केली केली आहे. अशी घाणेरडी परिस्थीती जगाच्या पाठीवर कुठेही नाही असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. धुळे आणि चाळीसगांव ला ललित पाटील तीन दिवस थांबला होता अशी माहिती आहे. तो येथे नेमका कशासाठी आला होता याची चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
ड्रग माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याला मोठ्या पोलिस बंदोबस्तात अंधेरी कोर्टात नेले जात आहे. दरम्यान ललित पाटील याची नार्को टेस्ट करा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. ललित पाटील चाळीसगाव आणि धुळ्याला का गेला होता असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणात ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर ललित पाटील याने गोप्यस्फोट केला आहे. मला पळवण्यात कोणाकणाचा हात आहे हे सर्व सांगणार असं ललित म्हणाला आहे. त्याला थोड्याच वेळात अंधेरी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मी ससूनमधून पळालो नाही तर मला पळवलं गेलं असे वक्तव्य ललित पाटील याने केले. काहे ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ललित फरार होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळल्या आहेत. त्यानंतर त्याने ही पहिली प्रतिक्रीया दिली.
“माझी निवडणुकीची वाटच नाही. आपली वाट एकच आहे- मराठा समाज. व्यवसायाच्या आधारावर जर बाकीच्यांना आरक्षण दिलं असेल तर मराठ्यांचा व्यवसाय हा शेती आहे. पंजाबराव देशमुखांनी ज्या कायद्याच्या आधारे आरक्षण दिलंय, तोच कायदा पुन्हा एकदा सुधारित करून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून राहिलेल्यांना घेऊच शकता. हेच माझं सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणं आहे. त्यांनी हा विषय गांभीर्याने हाताळणं खूप गरजेचं आहे,” असं जरांगे पाटील म्हणाले.
“आंदोलन कुठलंही असलं तरी सरकारवर विश्वास ठेवावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी काही धाडसी निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे आम्हाला आरक्षण देऊ शकतात. त्यांची तेवढी निर्णयक्षमता आहे. शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील असा विश्वास आहे,” असं जरांगे पाटील म्हणाले.
“सभेच्या वेळी लाईट बंद करण्यात आले, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मला 20 किलोमीटर चालत जावं लागलं होतं. तिथल्या स्थानिक लोकांनी विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्याची मदत केली. पण माध्यमांनी आमचा लढा झाकू दिला नाही”, असं जरांगे पाटील म्हणाले.
“छगन भुजबळ यांना असं वाटलं की आम्ही जमिनीच विकत घेतली. म्हणून त्यांनी सात कोटी रुपयांचा हिशोब लावला. सभेला जे काही आवश्यक होतं, त्यासाठी काहींनी जमिनी दिल्या होत्या. 22 गावांतच 21 लाख रुपये जमा झाले. आमच्या कष्टाचे पैसे आहेत, म्हणून सांगतोय. आमच्या जातीसाठी आम्ही कष्टाचे पैसे दिले,” असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिलं.
“एकटा मराठा समाज सरकारसाठी पुरेसा आहे. आरक्षण द्यायचं नसेल तर 40 दिवसांचा वेळ का घेतला? समिती का स्थापन केली? सरकारने आम्हाला शब्द दिला आहे. मराठा समाज कुणबीच आहे. आता शांत राहणार आणि 24 तारखेला सगळं बाहेर काढणार,” असं मनोज जरांगे पाटील टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
“आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही. वेदना समजून घ्या, मराठ्यांना आरक्षण द्या. माझी चूक असेल, तर मला दुरुस्त करा” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत ते बोलत आहेत.
इस्रायलच्या सर्व बंधकांना सोडण्याची तयारी हमासने दाखवली आहे. पण हमासने इस्रायलसमोर काय अट ठेवलीय? कुठल्या हल्ल्यानंतर हमासने तडजोडीची तयारी दाखवलीय?. वाचा सविस्तर….
सुषमा अंधारेच मोठं वक्तव्य. ललित पाटीलचा जयसिंगहानी होवू नये. ललित पाटीलला जर अटक करण्याच श्रेय तुम्ही घेत असाल तर फरार करण्याची श्रेय त्यांना घ्याव लागेल. ललित पाटीलला आम्ही अटक करू अस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तर मग त्यांना माहिती होती का ?. या सगळ्याच गौडबंगाल नेमक काय आहे. दादा भूसेंचा वरदहस्त असल्याशिवाय हे होत का ?. कारखाना कसा उभा राहतो ? असे सवाल सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत.
माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. 2019 ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत गेलो खऱ्या अर्थाने ती माझी चूक. आमच्या काकाने मला सल्ला दिला मी शरद पवारांची भेट घेतली लवकरच कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात प्रवेश करणार असं पांडुरंग बरोरा म्हणाले.
नार्वेकर त्यांचा पर्सनल लॉ चालवत आहेत. घटनेची मोडतोड करून मनमानी निर्णय घेतला जात आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली.
आता बस्स असं कोर्टाने सांगितलं. शिंदेंची गटनेतेपदी झालेली निवड चुकीची हे कोर्टानं नमूद केलंय, असं संजय राऊन म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांवर भाजपचा प्रचंड दबाव आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलं.
अध्यक्ष हे स्वत:ची बुद्धी चालवत नाहीत की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यांनी निरपेक्ष राहून निर्णय दिला पाहिजे, मात्र तसं होताना दिसत नाही, असेही थोरात म्हणाले.
मैदानासाठी वाद नको, यापुढे शिवतीर्थासाठी अर्ज करणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. दसरा मेळाव्यासाठी घेतलेल्या बैठकीत त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला.
पोलिसांकडून मानसिक त्रास दिला जातोय. ललितच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली जात आहे , असा गंभीर आरोप ललित पाटीलच्या वडिलांनी केला आहे.
ससून ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला अटक करण्यात आली. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी कारवाई मोठी कारवाई करत ललित पाटील याला चेन्नईमधून अटक केली.
तांत्रिक अडचणीमुळे हा ब्रिज पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची कमिटी नेमण्यात येईल. कमिटीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले
धुळ्यामध्ये यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शिंदखेडा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. दहा किलोस कांद्याला ४५१ रुपये भाव मिळाला आहे. या हंगामात प्रथमच कांद्याने ४५० रुपये टप्पा ओलांडला आहे. परराज्यातून कांद्याला मागणी वाढत असल्याने बाजारभाव उच्चांकी पाहायला मिळणार आहे. कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान…
ससून ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी कारवाई मोठी कारवाई केली आहे. ललित पाटील याला चेन्नईमधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आज पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईच्या एका भक्ताने गोंदियाच्या महाराणीला 21 इंच लांब सोन्याच्या हार दान केला आहे. मनोकामना पूर्ण झाली असल्याने भक्ताने दान केलं आहे. यापूर्वी अनेक भक्तांनी सोन्याचे हार चांदीचे पायदान महाराणीला दान केलं आहे. गोंदियाची महाराणी ही जागरूक देवी अशी भक्तांची श्रद्धा आहे.
कल्याण शहरात पसरली दाट धुक्याची चादर.. धुक्यामुळे जवळचे दिसत नसून इमारती आणि रस्ते देखील दिसेनासे झाले आहेत. शहर जणू काही या धुक्यात हरवून गेलं आहे असे वाटत होतं.
संभाजी नगर येथे समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 12 प्रवासी ठार झाले होते. त्यानंतर या महामार्गावर होणाऱ्या अपघातावरून चिंता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या 10 महिन्यात 1281 अपघात झाले आहेत. त्यात आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. दर महिन्याला समृद्धी महामार्गावर शेकडोच्या जवळपास अपघात होत आहे. सततच्या अपघातांमुळे एमएसआरडीसीची यंत्रणा हताश आणि हतबल झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नागपूरमध्ये स्वाईन फ्ल्यूची दहशत निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये स्वाईन फ्ल्यूने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर शहरात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसताच रुग्णालयात येऊन उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला चेन्नईतून अटक केली आहे. आज दुपारी ललितला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाणार आहे.
इस्रायलने गाजा पट्टीतील हल्ले वाढवले आहेत. इस्रायलने गाजा पट्टीत आता एअर स्ट्राईक केला आहे. रुग्णालयावर झालेल्या या हल्ल्यात 500 लोक दगावले आहेत. मात्र, इस्रायलने रुग्णालयावर हल्ला केला नसून हमासच्या अतिरेक्यांच्या स्फोटामुळे रुग्णालय जमीनदोस्त झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.