Nanded Loksabha Bypoll Election Result 2024 : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात मोठा फेरबदल, अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचा विजय, नेमकं काय घडलं?
राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेडच्या लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. यात काँग्रेसचा विजय झाला.
अटीतटीची लढत आणि काँग्रेसचा विजय
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे सुपूत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. तर भाजपने या ठिकाणी डॉ.संतुकराव हुंबर्डे यांना मैदानात उतरवलं होतं. तसेच वंचितनेही अविनाश विश्वनाथ यांना संधी दिली होती. नांदेड लोकसभेची मतमोजणी सुरु असताना रवींद्र चव्हाण आणि डॉ.संतुकराव हुंबर्डे यांच्या अटीतटीची लढत होती. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत कोण बाजी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांनी बाजी मारली आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, भाजपचे डॉ.संतुकराव हुंबर्डे यांना एकूण 5 लाख 85 हजार 331 मतं मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना 5 लाख 86 हजार 788 मते मिळाली. रवींद्र चव्हाण यांनी 1 हजार 457 मतांनी भाजपच्या डॉ.संतुकराव हुंबर्डे यांचा पराभव केला. यात वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ यांना तिसऱ्या क्रमांकाची 80 हजार 179 मतं मिळाली.
नांदेड विधानसभेत मात्र महाविकासआघाडीचा सुपडासाफ
दरम्यान नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यामध्ये किनवट, भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, हदगाव, लोहा, देगलूर, मुखेड या मतदारसंघाचा समावेश होतो. या जिल्ह्यात बहुतेक मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना रंगला आहे. नांदेडच्या 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यात भाजप 5, शिवसेना शिंदे गट 3 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.