राहुल गांधी यांच्या शिक्षेचे महाराष्ट्रात पडसाद, मुंबई काँग्रेस आक्रमक, काय घडतंय?
अशाप्रकारे राहुल गांधी यांच्यावरती कारवाई करणे या असंवैधानिक आहे. राहुल गांधी यांना भाजप घाबरलेला आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
मुंबई | चोरों का सरनेम मोदी क्यो होता है.. या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आज सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.कोर्टाने राहुल गांधी यांना जामीनदेखील मंजूर केला आहे. मोदी (Modi) आडनावावरून केलेली टीका राहुल गांधी यांना महागात पडल्याचं चित्र आहे. मात्र या शिक्षेचे पडसाद आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींना भाजप घाबरतंय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येतेय. मुंबईत आज विधानभवन परिसरात काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण, भाई जगताप, पृथ्वीराज चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला. तर महाराष्ट्रात इतर ठिकाणीही काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
ही कारवाई असंवैधानिक- नाना पटोले
राहुल गांधींना शिक्षेवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, ‘ अशाप्रकारे राहुल गांधी यांच्यावरती कारवाई करणे या असंवैधानिक आहे. राहुल गांधी यांना भाजप घाबरलेला आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, हे आता त्यांना समजलेला आहे त्यामुळे अशी कारवाई केली जातेय. आम्ही याचा निषेध नोंदवण्यासाठी एमआरसीला सर्व नेते एकत्र येतोय. आम्ही बैठक घेऊन आता पुढची रणनीती ठरवतोय आणि या संपूर्ण प्रकरणाचा निषेध आहे. भाजपकडून ही सुडाची कारवाई केली जाते. सुरत कोर्टाने ज्या पद्धतीने समंन्स पाठवलं आणि शिक्षाही सुनावली हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या घटनेवर निषेध नोंदवला. ते म्हणाले, ‘ भाजपाला आता कळून चुकलं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय. त्यामुळे ते राहुल गांधीला टार्गेट करतात. हे जाणीवपूर्वक होते आणि याचा आम्ही निषेध नोंदवतो आणि भविष्यातही ज्या ज्या वेळी अशा पद्धतीची कारवाई होईल काँग्रेस नेहमीच निषेध नोंदवेल..
लोकशाहीसाठी घातक- अशोक चव्हाण
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ सुरत कोर्टाने ज्या पद्धतीने समन्स पाठवलं. आणि शिक्षाही सुनावली हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. मी काँग्रेसच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाचा तीव्र निषेध करतो. एमआरसीला आम्ही आंदोलन घेत आहोत. त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडू त्यासोबतच देशभरामध्ये या घटनेचा तीव्र निषेध आता नोंदवला जाईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.