Maharashtra Corona Update : राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण! सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांनाही आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
काही लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी ते संबंधित विभागाला कळवत नाहीत. अशा लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्या. तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल केले जातील आणि तुमच्यावर आरोग्यासंबंधी लक्ष ठेवलं जाईल.
मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Patients) काहीशी घट पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आलीय. तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी आहे. त्यातील 86 टक्के रुग्ण होम क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलीय. तसंच घरच्या घरीच सेल्फ किटद्वारे चाचणी करणाऱ्या नागरिकांना टोपे यांनी महत्वाचं आवाहन केलंय.
राजेश टोपे म्हणाले की, काही लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी ते संबंधित विभागाला कळवत नाहीत. अशा लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्ती त्रास नसेल तर त्यांनी होम क्वारंटाईन राहू द्या. तुम्हाला दिवसातून फक्त दोन कॉल केले जातील आणि तुमच्यावर आरोग्यासंबंधी लक्ष ठेवलं जाईल.
‘लसीकरणाची गती वाढायला हवी’
तसंच राज्यात लसीकरणाचं प्रमाण कमी होता कामा नये. लसीकरणाची गती वाढाला हवी. त्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना लसीकरणासाठी पुढे आणलं पाहिजे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच कार्यालयात प्रवेश देण्याचा विचार आता घ्यावा लागेल. ते जनहिताचं किंबहुना राज्याच्या हिताचं आहे, असंही टोपे म्हणाले.
लसीकरणात देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्र थोडा मागे
राज्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या लोकांचं प्रमाण 90 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण 62 टक्के आहे. तरीही आपण देशाच्या सरासरीपेक्षा थोडं कमी आहोत, हे योग्य नाही. आपण मार्गदर्शक राज्य आहोत. त्यामुळे हे योग्य नाही. आपण 15 टे 19 वयोगटातील मुलांचं 35 टक्के लसीकरण केलं आहे. अशीच गती राहिली तर पुढील 8 ते 10 दिवसात या वयोगटातील लसीकरण आपण पूर्ण करु, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
लसीच्या पुरवठ्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलणार – टोपे
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसी आम्हाला कमी पडत आहेत. त्याबाबत आपण केंद्र सरकारला कळवणार आहोत. आज अनेक जिल्ह्यातून कोव्हॅक्सिन संपले म्हणून फोन येत आहेत. त्याबाबत लसीचा पुरवठा करण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तर ऑक्सिजनची एकूण मागणी 400 मेट्रिक टन आहे. त्यात कोविड आणि नॉन कोविड आहे. पण फक्त कोविडसाठी आपल्याला 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल असं आपण म्हटलं आहे. पण सध्या नॉन कोविडसाठी अडीचशे तर कोविडसाठी दिडशे मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे, असंही टोपे यांनी सांगितलं.शाळांबाबतही प्रदीर्घ चर्चा झाली. पुढील 15 – 20 दिवस शाळा अजून बंद राहतील अशी चर्चा आज झाली. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असंही टोपे म्हणाले.
इतर बातम्या :