जामखेडच्या रुग्णालयातील उपचारपद्धती कोरोनावर फायदेशीर? विचार व्हावा, रोहित पवारांचं आवाहन
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर एका खास उपाचारपद्धतीद्वारे उपचार केले जात आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना माहिती दिलीय.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही झपाट्याने वाढतंय. कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. असं असलं तरी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणं राज्याच्या आरोग्ययंत्रणेपुढे मोठं आव्हान बनलंय. अशावेळी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर एका खास उपचारपद्धतीद्वारे उपचार केले जात आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना माहिती दिलीय. त्याबाबत रोहित पवार यांनी एक फेसबूक पोस्टही लिहिली आहे. (treatment at Arole Hospital in Jamkhed should be used to treat corona)
रोहित पवारांची फेसबूक पोस्ट
रेमडेसिवीर हा एकमेव उपचार असल्याचा समज तयार झाल्याने रेमडेसिवीर ची मागणी प्रचंड वाढली आणि मोठ्या प्रामाणात मागणी वाढल्याने मागील काळात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला. परंतु याबाबत वैद्यक तज्ज्ञांचं मत जाणून घेतलं असता केवळ रेमडेसिवीर हा एकच उपाय नसल्याचं त्यांचं मत आहे. ऑक्सिजन थेरपी, विटामिन, स्टेरॉइड, ब्लड थिनर्सची एकत्रितपाने योग्य पद्धतीने उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होत असल्याचे निरीक्षण ‘कोविड टास्क फोर्स’मधील डॉक्टरांनीही नोंदवलंय.
रेमडेसिवीर हा एकमेव उपचार असल्याचा समज तयार झाल्याने रेमडेसिवीर ची मागणी प्रचंड वाढली आणि मोठ्या प्रामाणात मागणी…
Posted by Rohit Rajendra Pawar on Thursday, 15 April 2021
आरोळे हॉस्पिटलमधील विशेष उपचार पद्धती
माझ्या मतदार संघात जामखेडमध्येही आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी स्वतंत्र उपचार पद्धती राबवत रेमडेसिवीर या महागड्या औषधाचा कमीत कमी वापर करत 3 हजार 700 रुग्णांना बरं केलं. ह्या उपचार पद्धतीची माहिती मी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र कोव्हीड टास्क फोर्स’पर्यंत पोचवलीय. मला वाटतं या उपचार पद्धतीबाबत अधिक संशोधन करून एक मॉडेल उपचार पद्धती संपूर्ण राज्यभरासाठी राबवता येईल का, याबाबत तज्ज्ञांनी विचार करायला हवा.
काल-परवा पर्यंत केवळ महाराष्ट्रात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती परंतु आज उत्तरप्रदेश, गुजरात, बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, परिणामी औषध पुरवठा, मेडिकल इक्वीपमेंट, आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढतोय. यामुळं आपल्याला खूप सूक्ष्म नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ICMR च्या माध्यमातून पर्यायी उपचार पद्धतीबद्दल त्वरित कार्यवाही करावी.
‘पुढे चुका होणार नाहीत, याची काळजी घ्या’
योग्य वेळी योग्य पावलं उचलणं गरजेचे असून उशीर झाल्यास सामान्य जनतेला गंभीर परिणाम भोगावे लागतात. रेमडेसिवीर निर्यात तसेच भारताबाहेरील लसींना मान्यता देण्याबाबतीत जी दिरंगाई झाली ती आपल्या देशाला परवडणारी नाही. आजपर्यंत चुका कुणी काय केल्या याची उजळणी करण्यापेक्षा यापुढं चुका होणार नाहीत, याची काळजी सर्वांनीच घ्यावी आणि कोरोनाच्या महामारीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत!
संबंधित बातम्या :
रोहित पवारांनी विरोधकांना दाखवला आरसा, भाजपशासित राज्यातील परिस्थिती सांगत राजकारण टाळण्याचं आवाहन
Maharashtra Lockdown: मुंबईकरांनो सावध व्हा; गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही बंद होणार
treatment at Arole Hospital in Jamkhed should be used to treat corona