Maharashtra Election Result : मुख्यमंत्रीपदासाठी कोणाकोणाचे नाव चर्चेत?
विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासात जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात एक्झिट पोलने सगळ्यांचीच धाकधूक वाढवली आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणाकोणाची नावे चर्चेत आहेत. जाणून घ्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल काही तासात जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. एक्झिट पोल आणि बेटिंग मार्केटच्या आकडेवारीनुसार, महायुती पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते. मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांचे बहुमत आवश्यक आहे. दोन प्रमुख आघाड्या महायुती ज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट यांचा समावेश आहे. दुसरी प्रमुख आघाडी म्हणजे महाविकास आघाडी (MVA). ज्यामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवत आहेत.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्याचवेळी अजित पवार हे देखील संभाव्य पर्याय आहे. तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजून पत्ते उघड केलेले नाहीत, मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून अद्याप एकाही चेहऱ्यावर दावा करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी भाजपने 148 जागांवर, शिवसेनेने (शिंदे गट) 80 जागांवर, राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने 65 जागांवर निवडणूक लढवली आहे. तर काँग्रेसने 125 जागा, राष्ट्रवादी (शरद पवार गट)ने 90 जागा. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) 75 जागांवर निवडणूक लढवली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात पहिले नाव समोर येते ते अजित पवार यांचे. अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढवली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे योगेंद्र पवार हे उभे होते. देवेंद्र फडणवीस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत.