छत्रपती शिवाजी महाराज अन् राष्ट्र पुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज असताना देशात आदिलशाही, मोघलाई, कुतबशाही होती. परकीय आक्रमकांचे राज्य कधीच संपणार नाही, असे वाटत होते. सर्वत्र अंधकार झाला होता, असे वाटत होते. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी सूर्य निर्माण झाला.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपुरुषांचे अवमान होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याबाबत काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. आता शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरुन शनिवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्यात कठोर कायदा करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदयनराजे यांनी काही मागण्या केल्या. छत्रपतींचा अपमान करताना कठोर शिक्षा झाली पाहिजे. खरेतर त्यांना टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे. परंतु आपण लोकशाही राहतो. त्यामुळे त्यासंदर्भात नियम तयार करण्याचे काम करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रमाण इतिहास राज्य शासन करणार आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय आता सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात आला आहे. आम्ही उच्च न्यायालयात या प्रकरणी लढा देऊन स्मारक उभारण्याच्या मागणीत यश मिळवू.
छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत का आहेत? त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज असताना देशात आदिलशाही, मोघलाई, कुतबशाही होती. परकीय आक्रमकांचे राज्य कधीच संपणार नाही, असे वाटत होते. सर्वत्र अंधकार झाला होता, असे वाटत होते. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांसारखा तेजस्वी सूर्य निर्माण झाला. शिवाजी महाराज नसते तर आपण कोणीच नसतो. कारण आपल्यातील तेज जागवण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. आठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांनी आपल्यामधील तेज जागृत केले. मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. संपूर्ण भारतात केवळ शिवाजी महाराजांमुळे भगव्याचे राज्य आले.




नवी दिल्लीत स्मारक उभारणार
नवी दिल्लीत शिवाजी महाराजांचे स्मारक असले पाहिजे. त्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांना भेटू आणि त्यांची मदत घेऊन दिल्लीत स्मारक उभारु, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळाले आहे. आता फ्रान्समध्ये त्यावर सादरीकरण होणार आहे. आम्ही तिथे जाणार आहोत. त्यामुळे या किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळेल, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.
अमित शाह यांचा कणखर आणि कर्मठ गृहमंत्री असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शाह हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक म्हणून आले आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला आणि समजून घेतला. ते गृहमंत्री म्हणून आले नाहीत तर शिवाजी महाराजांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले आहेत.