देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, मंत्रिपदांचा फॉर्म्युलाही ठरला; शिंदे गट आणि अजितदादाच्या गटाच्या वाट्याला काय?
महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. आता नुकतंच मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीतील एका नेत्याचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकमत मिळाले. आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट या तिन्हीही पक्षांतील कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी जोरदार लॉबिंग केले जात आहे. त्यातच महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. आता नुकतंच मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीतील एका नेत्याचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत. त्यातच आता नवीन सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आले आहे.
दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असेही बोललं जात आहे. यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत. तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अमित शाह आज मुंबईत येण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला गेले होते. आज दिल्लीत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे. अमित शाह हे आज मुंबईत येणार असल्याचे बोललं जात आहे. अमित शाह निरीक्षक म्हणून उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीतच आज एक पत्रकार परिषद होणार आहे. यात अमित शाह हे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याची घोषणा करणार आहेत.