बिनविरोध ग्रामपंचायत, राजकारणाचा नवा भूलभुलय्या?
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र असलं तरी गावागाड्याचं राजकारण वेगळं असतं. त्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडकडूनही ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली जात आहे. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
मुंबई: कोरोना संकटाच्या काळात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर लाखो रुपयांचं बक्षीस विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जाहीर करुन टाकलं आहे. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात सत्ता केंद्र म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष रणनीती आखत असतानाच काही लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास 20 ते 25 लाख रुपयांच्या निधी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, हा एकप्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचं काहींचं म्हणणं आहे. (Maharashtra Gram Panchayat Election 2021)
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र असलं तरी गावागाड्याचं राजकारण वेगळं असतं. त्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडकडूनही ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली जात आहे. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागात ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आज काय हालचाली आहेत, पाहूया
औरंगाबाद:
गावपातळीवर राजकीय आखाड्यात आता संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुका संभाजी ब्रिगेड लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी तशी घोषणा केली आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचातय निवडणूक सर्व ताकदीनिशी लढण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.
भिवंडी:
भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडायला आता सुरुवात झाली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निहाय कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु केली आहे. यावेळी तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुकानिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलीय. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तसे आदेश काढले आहेत. 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी दिली होती. त्यानुसार या नेमणूका करण्यात आल्या आहेत. निवडणूक कामकाजाचे नियंत्रण आणि आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जाहीर बक्षिसीचा पैसा येणार कुठून?
आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास घडवून आणण्यासाठी 3 कोटींचा निधी दिला जातो. त्यातील निधी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांतील समस्यांची यादी बनवून त्यानुसार या बक्षिस म्हणून जाहीर केलेल्या निधीतून विकासकामे करण्यात येणार असल्याचं एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
निवडणुका बिनविरोध करा, बक्षिस जाहिर करणारे आमदार
- निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस (पारनेर,अहमदनगर) आमदार निधीतून 25 लाखांचा विकास निधी देणार
2. कैलाश पाटील, शिवसेना (कळंब-उस्मानाबाद) आमदार निधीतून 25 लाख रुपये देणार
3. रत्नाकर गुट्टे, रासप ( गंगाखेड,परभणी) स्वत:च्या आमदार निधीतून गावांच्या लोकसंख्येनुसार 11 ते 21 लाखांचा निधी देणार
4. अभिमन्यू पवार, भाजप (औसा, लातूर) आमदार निधी आणि इतर निधीतून 21 लाखांचा निधी देणार
5. चिमणराव पाटील, शिवसेना (पारोळा, जळगाव) आमदार निधीतून 21 लाख रुपये
6. श्वेता महाले, भाजप (चिखली, बुलढाणा) आमदार निधीतून 21 लाख रुपये
7. सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस (मावळ) आमदार निधीतून 11 लाख रुपये
8. अभिजित पाटील पंढरपूरचे कारखानदार
स्वत:कडून प्रत्येकी 1 लाख रुपये देणार
9. सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस, देवळाली)
आमदार निधीतून 25 लाख रुपये
संबंधित बातम्या:
लाखांचे आमदार बक्षिस देणार; पण पैसा नेमका कुठून येणार? वाचा सविस्तर रिपोर्ट
गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर
Maharashtra Gram Panchayat Election 2021