मुंबई : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. आरोग्यमंत्री टोपे आज दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते (Rajesh Tope demands 20 Lakh corona vaccine dose for Maharashtra).
राजेश टोपे काय म्हणाले?
यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर 60 वर्षावरील आणि 45 वयोगटावरील (सहव्याधी असलेले) सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये 1.77 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 2.20 कोटी कोव्हीडशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचा आवश्यकता आहे.”
या अनुषंगाने दर आठवड्यात 20 लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे Rajesh Tope demands 20 Lakh corona vaccine dose for Maharashtra).
209 खासगी आणि शासकीय रुग्णालयांना लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी
“राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी 367 खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यापैकी 209 रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित रुग्णालयांना लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी. लसीकरणानंतर आढळून येणाऱ्या दुष्परिणामांची संख्या किरकोळ असून लसीकरण केंद्रासाठी 100 खाटांचे रुग्णालय असावे. या निकषातून सवलत द्यावी आणि 50 बेड असलेल्या रुग्णालयांमध्येही केंद्र सुरू करावे जेणेकरून लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होईल”, असे टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले.
हेही वाचा : Sachin Vaze case : ‘त्या’ मर्सिडीजच्या डिक्कीत कोणतं गूढ दडलंय? NIA अधिकाऱ्यांकडून शोध सुरु