HSC Result | बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के गुण होते? शकुंतला काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
बोर्डाचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांना दहावी-बारावीत किती टक्के गुण मिळाले होते? Shakuntala Kale journey HSC result
HSC Result 2020 पुणे: राज्यातील बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा बारावीचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. यंदा कोरोना संकटामुळे निकाल जवळपास दीड महिने लांबला. निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींनीही बाजी मारली. यंदाच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे बोर्डाने पत्रकार परिषद न घेता, माध्यमांना प्रेसनोट पाठवून निकाल जाहीर केला. दुपारी 1 वाजता बोर्डाची वेबसाईट www.mahresult.nic.in वर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. (Shakuntala Kale journey HSC result )
राज्य शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे या दरवर्षी दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल जाहीर करतात. डॉ शकुंतला काळे या चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतातच, पण ज्यांना कमी गुण मिळाले आहेत किंवा अनुत्तीर्ण झाले, त्यांना सर्वाधिक धीर देण्याचं काम त्या करतात. (Shakuntala Kale journey HSC result )
बोर्डाचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांना दहावी-बारावीत किती टक्के गुण मिळाले होते? याची उत्सुकता अनेकांना असू शकते. त्या उत्सुकतेपोटीच टीव्ही 9 मराठीने थेट बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे गुण जाणून घेतले. गेल्या वर्षी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे गुण आणि त्यांचा प्रवास जाणून घेतला होता. (Shakuntala Kale journey HSC result )
बोर्डाच्या अध्यक्षांना दहावीत किती टक्के?
डॉ. शकुंतला काळे यांनी 1978 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. शकुंतला काळे यांना दहावीच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी 10वीत मुलींमध्ये प्रथम आल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील जनता विद्यामंदिर घोडेगाव येथे त्यांचं 10 वी पर्यंतचं शिक्षण झालं. मात्र दहावीनंतर लगेचच त्यांचं लग्न झालं. पण त्यांच्या कुटुंबाने त्यांना साथ दिली. त्याकाळी त्यांनी 10 वी नंतर सेवासदन डीएड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महत्त्वाचं म्हणजे डॉ. शकुंतला काळे यांना डीएडलाही 70 टक्के गुण मिळाले. त्यानंतर बीए, एमए पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं.
शकुंतला काळे यांना डॉक्टर व्हायचं होतं. मात्र ते होता आलं नाही म्हणून त्या साहित्यातील डॉक्टर झाल्या आणि आज बोर्डाच्या अध्यक्षा आहेत. सासरी आणि माहेरी सहकार्य मिळाल्यामुळेच आपण शिक्षण पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं.
शकुंतला काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
शंकुतला काळे यांचा बोर्डाच्या अध्यक्षपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. दहावी झाल्यानंतर म्हणजे 14-15 व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं. शकुंतला काळे या चौथीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे त्यांच्या घराची जबाबदारी आईवर होती. आईने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या गावात ज्युनिअर कॉलेज नव्हतं. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागे. शकुंतला काळे यांचं लग्न झाल्यानंतरही त्यांना शिक्षण पुढे सुरु ठेवायचं होतं. त्यांनी त्याबाबत पतीकडून मंजुरी मिळवून शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी डीएड, मग बीए आणि त्यानंतर सावित्रीबाई फुळे पुणे विद्यापीठातून मराठीमध्ये एमए केलं.
ज्या शाळेत शिकल्या, तिथेच शिक्षिका
योगायोग म्हणजे शकुंतला काळे या ज्या शाळेत शिकल्या, त्याच शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यावेळची शैक्षणिक परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यादरम्यानच त्यांनी MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देण्याचं ठरवलं. त्यांच्याकडे स्पर्धा परीक्षांची पुस्तके, टीव्हीसारखी माध्यमे नव्हती. आख्ख्या गावात एकच टीव्ही होता. शाळेतून आल्यानंतर घरची कामं उरकून, मुलं झोपल्यानंतर त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या. त्यांना रात्री केवळ 4 तासांचीच झोप मिळत असे. कारण पहाटे 3 वाजता त्यांना पाणी भरण्यासाठी उठावं लागे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांच्याकडे पुस्तके, मार्गदर्शक किंवा तत्सम साधने नव्हती. त्यामुळे त्यांनी जनरल नॉलेज वाढवण्यासाठी रेडिओ ऐकण्यास सुरुवात केली.
1993 मध्ये शकुंतला काळे MPSC च्या क्लास टू परीक्षेत पास झाल्या. त्यांची नियुक्ती सोलापुरात शिक्षण विभागात झाली. त्यानंतरही शकुंतला काळे यांनी आपला अभ्यास सुरुच ठेवला. 1995 मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा देत, त्या क्लास वन अधिकारी झाल्या. त्यावेळी त्यांची नियुक्ती महिला शिक्षण आणि विस्तार विभागात झाली. त्याच वर्षी त्यांनी पीएचडी पूर्ण केली. राज्यातील विविध शिक्षण विभागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर, सप्टेंबर 2017 मध्ये शकुंतला काळे यांची नियुक्ती राज्य शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी झाली. तेव्हापासून त्या हे पद भूषवत आहेत.
संबंधित बातम्या
HSC Results Live Update | बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 90.66%