सांगलीच्या सुपुत्राचा एव्हरेस्टवर तिरंगा, संभाजी गुरव महाराष्ट्र पोलिसातील पहिले मराठी अधिकारी
एव्हरेस्ट शिखरावर 23 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी संभाजी गुरव यांनी भारताचा राष्ट्रध्वज रोवला. (Sangli's Sambhaji Gurav Mount Everest)
सांगली : पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी 8 हजार 848 मीटर उंची असलेले जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माऊण्ट एव्हरेस्टला गवसणी घातली. संभाजी गुरव हे मूळ सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पडवळवाडी गावचे आहेत. महाराष्ट्र पोलीस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे ते पहिलेच मराठी अधिकारी ठरले आहेत. तर सुहेल शर्मा आणि रफीक शेख यांच्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे पोलीस अधिकारी आहेत. (Maharashtra Police Sangli’s Sambhaji Gurav became First Marathi Police Officer to Climb Earth’s highest mountain Mount Everest)
हिंमत सोडली नाही
पोलीस उपनिरीक्षक असलेल्या संभाजी गुरव यांनी 2019 मध्ये सर्वात आधी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला. ऑक्सिजन सिलिंडर वगैरे सर्व साहित्य सोबत असूनही प्रकृतीने त्यांना साथ न दिल्यामुळे त्यांना एव्हरेस्ट शिखर मोहीम अर्ध्यावर सोडून माघारी परतावे लागले. गुरव यांनी जिद्द न सोडता “एव्हरेस्ट शिखर” सर करण्याचा निर्धार केला. त्यांनी नियमित अवघड पर्वत सर करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. आणखी एकदा त्यांनी प्रयत्न केला, पण तरीही त्यांना यश आले नव्हते.
तिसऱ्या प्रयत्नात एव्हरेस्टला गवसणी
संभाजी गुरव 6 एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेसाठी मुंबईहून निघाले. अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी एव्हरेस्टची चढाई सुरुच ठेवली. अखेर त्यांना तिसऱ्या प्रयत्नात माऊण्ट एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यश आले. एव्हरेस्ट शिखरावर 23 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज रोवला.
पडवळवाडीच्या गावकऱ्यांना मोठा आनंद
गुरव यांच्या कामगिरीमुळे सांगलीतील वाळवा तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे. जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा मान मिळवणारे ते वाळवा तालुक्यातील पहिले नागरिक ठरले आहेत. एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल पडवळवाडीच्या गावकऱ्यांना सुद्धा फार मोठा आनंद होत आहे.
संभाजी गुरव गेल्या 15 वर्षांपासून पोलीस दलात आहेत. ते सध्या पनवेलमध्ये पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. एक धाडसी अधिकारी म्हणून पोलीस खात्यामध्ये त्यांच्याकडे पाहिले जाते. शालेय जीवनापासूनच ते जिद्दी आणि धाडसी विद्यार्थी म्हणून ओळखले जात. (Sangli’s Sambhaji Gurav Mount Everest)
महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी
याआधी महाराष्ट्र पोलीस दलातील सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आणि औरंगाबादमधील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. पण एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव पहिले मराठी पोलिस अधिकारी ठरले आहेत.
संबंधित बातम्या :
पालघरच्या आदिवासी मुलाकडून एव्हरेस्ट सर!
VIDEO : एका पायाने माऊंट एव्हरेस्ट सर, पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक
(Maharashtra Police Sangli’s Sambhaji Gurav became First Marathi Police Officer to Climb Earth’s highest mountain Mount Everest)