आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने मोठी खळबळ माजली. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून पुढचा बळी कोणाचा, तो मंत्री कोण असे अनेक तर्क व्यक्त होत आहेत

शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने मोठी खळबळ माजली. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून पुढचा बळी कोणाचा, तो मंत्री कोण असे अनेक तर्क व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर आणखी मोठा दावा केला आहे. 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत, त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं, त्यांचा बळी जाणार. त्यासाठी भाजपाचेच काही जण मदत करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी जयकुमार रावल यांच्यावरही टीका करत अनेक आरोप केले.
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये अशी अनेक पात्रं आहेत, ज्यांचे अनेक चेहरे आता समोर यायला लागले आहेत. मुंडे यांचा बळी गेला, अजून काही अशा प्रकारचे लोकांचाही बळी जाईल. जयकुमार रावल यांनी जी रावल को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत, जनतेचा पैसा त्यांनी लाटला आहे. हे प्रकरण मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाठवणार आहे. तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का ? असा सवालमला त्यांना विचारायचा आहे, असे राऊत म्हणाले. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन राव यांनी लाटली, राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत त्यांची हिंमत गेली. हायकोर्टाने त्या लूटमारीवर ताशेरेही ओढल्याचे राऊत म्हणाले. असे मंत्री सरकारमध्ये आहेत, असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत, त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं, बिघडवलं आहे. अशा मंत्र्यांचे बळी जाणारच. आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोकं हत्यारं पुरवत आहेत , असा गौप्यस्फोट राऊतांनी केला.
हिंसक हिंदुत्ववाद्यांचे लोक सत्तेत, मग कबर हटवण्यास अडवलं कोणी ?
मुघल बादशाह औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर हटवण्याच्या मुद्यावरून राज्यात सध्या वातावरण तापलेलं आहे. याच मुद्यावरून संजय राऊतांनीही सुनावलं आहे. हिंसक हिंदुत्ववाद्यांचे लोक सत्तेत, कबर हटवण्यास कोणी अडवलं ? असा सवाल राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात, देशात राज्य कोणाचं आहे ? त्यांच्याच (भाजप) पक्षाचं आहे ना. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत ? याच विचारांच्या लोकांचे, हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत ना. मग कबर हटवायला त्यांना कोणी अडवलंय ? शासनाने कबर हटवावी ना, त्यासाठी मारामाऱ्या करून, नाटकं करून लोकांना त्रास का देताय ? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. सांगा आरएसएसला फर्मान काढा म्हमून. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ही आरएसएसचीच, भाजपचीच पिल्लं आहेत ना. हे सगळं करून वातावरण खराब करण्यापेक्षा शासकीय अध्यादेश काढा , हिंमत आहे का ? असं राऊत म्हणाले.