ST Bus Strike : लालपरीची चाकं थांबली, एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, महत्त्वाच्या मागण्या काय?
एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होणार आहेत.
ST Employees Strike : ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचारी संघटना आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करणार आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. एसटी कामगाराने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले जात आहे.
प्रवाशांची गैरसोय
एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी काल राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला. यानंतर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे. त्यासोबतच मूळ वेतनात जाहीर केलेल्या 5000, 4000 आणि 2500 रुपयांऐवजी सरसकट 5000 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी एसटी कर्माचाऱ्यांकडून केली जात आहे.
1. खाजगीकरण बंद करा.
2. सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.
3. इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा.
4. जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.
5. चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या
6. वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.
7. सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी..
8. विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.
या आणि इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात, असे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आता या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.