एसटीला गर्दीचा मे महीना फळला, कोरोनाकाळानंतर 31 विभागांपैकी 13 विभागाचं उत्पन्न वाढलं
अकोला विभागाच्या माहे एप्रिल आणि मे 2023 च्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांना पत्र लिहून एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थपापकीय संचालक शेखर चन्ने यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.
मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला उन्हाळी हंगाम फायद्यात गेला आहे. कोरोना काळानंतर एसटीच्या अनेक गाड्या नादुरूस्त अवस्थेत असूनही एसटी महामंडळाने आता नव्याने उभारी घेतली आहे. एसटी महामंडळाच्या 31 पैकी 13 विभागांनी गर्दीच्या उन्हाळी हंगामात मे महिन्यात खर्चापेक्षा जास्त उत्पन्न ( सवलतमूल्यासह ) मिळविले आहे. खर्चाहून अधिक उत्पन्न मिळण्यात राज्यात अकोला विभागाने सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थपापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पत्र लिहून अकोला विभागाचे खास अभिनंदन केले आहे.
एसटीच्या अकोला विभागाने 1-10 मे दरम्यान ( मार्च – 2023 महिन्याच्या तुलनेत ) आपल्या दैनंदिन खर्चापेक्षा 8 रूपये प्रति किलो मीटर उत्पन्न मिळवत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. एसटी महामंडळाच्या 31 पैकी 13 विभागांनी आपल्या खर्चापेक्षा जास्त उत्पन्न ( विविध सवलत मूल्याच्या प्रतिपूर्ती रक्कम सह ) मिळविले आहे. अर्थात, एसटीच्या दृष्टीने मे महिना वर्षभरातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा महिना जरी असला तरी, गेल्या तीन-चार वर्षात एसटीची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता एवढ्या वेगाने उत्पन्न वाढीसाठी निम्म्यापेक्षा जास्त विभागांना मिळालेले यश निश्चित कौतुकास्पद असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
13 विभागांचे खर्चापेक्षा उत्पन्नात वाढ
अकोला विभागाचे 1 ते 10 मे दरम्यान दर किमी सवलत मूल्यासह मिळालेल्या 64.86 रूपये उत्पन्नाची मार्च 2023 च्या दर किमी खर्चाशी तुलना केली असता 8.29 रूपयांचा फरक दर किमी होत आहे. म्हणजे अकोला विभागाचे दर किमीला उत्पन्न आठ रूपयांनी वाढले आहे. अशाच प्रकारे बीड विभागाचे उत्पन्न दर किमी 6.25 रु., अनुक्रमे परभणी – 5.88 रु., जालना – 5.42 रु., बुलढाणा – 4.73 रु., संभाजीनगर – 4.05 रु., भंडारा – 3.42 रु., यवतमाळ – 3.32 रु., गडचिरोली – 3.15 रु., वर्धा – 1.85 रु., नांदेड – 1.80 रु., लातूर – 1.23 रु., जळगाव – 1.07 रु. दर किमी खर्चापेक्षा उत्पन्न मिळविल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
अकोला विभाग नियंत्रकांचे अभिनंदन
राज्य परिवहन विभागाच्या अकोला विभागाच्या माहे एप्रिल आणि मे 2023 च्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांना पत्र लिहून एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थपापकीय संचालक शेखर चन्ने यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.
मार्गस्थ बिघाड होण्याचे प्रमाण जास्त
कोरोना साथीनंतर एसटी महामंडळाचे उत्पन्न पुन्हा वाढत आहे. जानेवारी 2020 च्या तुलनेत सध्या 5000 बसेसचा तुटवडा आहे. दहा वर्षांहून अधिक आयुर्मान झालेल्या आठ हजाराहून अधिक गाड्यांची दुरूस्ती सुटे भाग वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रखडली आहे. त्यामुळे मार्गस्थ बिघाडांचे प्रमाण जास्त आहे. त्यातच डिझेलचे वाढते दर या सगळ्या अडचणींवर मात करत एसटीच्या जवळपास निम्या विभागांनी आर्थिक दृष्ट्या सक्षमतेकडे पाऊल टाकले आहे.