Corona : कोरोना रुग्ण वाढतायत! महाराष्ट्र सक्रिय रुग्णांमध्ये टॉपवर, काय आहे देशाची कोरोना स्थिती? जाणून घ्या…
महाराष्ट्रात सध्या 11 हजार 571 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 70 टक्के सक्रिय प्रकरणे एकट्या मुंबईत आहेत.
नवी दिल्ली : देशात (India) पुन्हा एकदा कोरोना (Corona) संकटाचे ढग गडद होताना दिसतायेत. देशासह महाराष्ट्रात (Maharashtra) देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यातच आता नवी आकडेवारी समोर आली आहे. यावरुन सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याच दिसतंय. देशात पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण वाढण्याचा ट्रेंड दिसू लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सात हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गुरुवारी देशात 7 हजार 584 रुग्ण आढळले आहे. 24 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णांची संख्या 4 कोटी 32 लाख 5 हजार 106 झाली आहे. तर आतापर्यंत या संसर्गामुळे 5 लाख 24 हजार 747 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय यापूर्वी बुधवारी देशात 7240 पॉझिटिव्ह आढळले होते. तर 8 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या 7 दिवसांचं कोरोना आकडेवारी बघितल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असल्याचंही समोर आलं 3 जूनला देशात केवळ 3945 पॉझिटिव्ह होते. आता ही संख्या 7584 वर पोहोचली आहे. यामुळे कोरोना संकटाचे ढग गडद होताना दिसतायेत.
देशाची कोरोना आकडेवारी पाहा
#COVID19 | India reports 7,584 fresh cases, 3,791 recoveries, and 24 deaths in the last 24 hours.
Total active cases are 36,267 pic.twitter.com/kwQIIy8K3s
— ANI (@ANI) June 10, 2022
सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्र टॉपवर, चिंता वाढली
महाराष्ट्रात कोरोनानं पुन्हा एकदा जोर पकडलाय. गुरुवारी राज्यात 2,813 नवीन रुग्ण आढळले आहेत. 1,047 लोक बरे झाले आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी नवीन प्रकरणांमध्ये 4 टक्के वाढ झालीय. एकट्या मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 1700हून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. गेल्या नऊ दिवसांत मुंबईतील नवीन रुग्णांमध्ये 138 टक्के आणि सक्रिय रुग्णांमध्ये 135 टक्के वाढ झाली आहे. राज्यात आता 11 हजार 571 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. याआधी केरळ अव्वल स्थानावर होते. आता 11 हजार 329 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईकरांनो सावधान
महाराष्ट्रात सध्या 11 हजार 571 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 70 टक्के सक्रिय प्रकरणे एकट्या मुंबईत आहेत. म्हणजेच या 9 दिवसांत सक्रिय प्रकरणे 2 हजार 970 वरून 8 हजारावर पोहोचली आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून येथे 79 लाखांहून अधिक रुग्णांची लागण झालीय. 77 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 47 हजारांहून अधिक रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय.
केरळमध्ये वेग थांबेना
केरळमध्ये कोरोना थांबण्याचे नाव घेत नाहीय. गेल्या 24 तासांत याठिकाणी 2193 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. 1296 रुग्ण बरे झाले आणि 17 संक्रमित लोकांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये सकारात्मकता दर 11.50 टक्के आहे. याचा अर्थ 100 पैकी 12 रुग्णांना संसर्ग होतोय. हा इतर राज्यांपेक्षा खूप जास्त आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी नवीन प्रकरणांमध्ये 3 टक्क्यानं घट झाली होती. म्हणजेच गुरुवारी 78 नवीन प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली. बुधवारी 2271 नवे बाधित आढळले.
दिल्लीत पुन्हा केसेस वाढल्या
राजधानी दिल्लीत गुरुवारी पुन्हा नवीन केसेस वाढल्या. दिल्लीत 622 नवीन रुग्ण आढळले. 537 रुग्ण बरे झाले. तर 2 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोनाच्या रुग्णांमध्ये 10 टक्के वाढ झाली. बुधवारी 564 नवीन रुग्ण आढळले. राजधानीत सकारात्मकता दर 3.12 टक्क्यांवर पोहोचलाय. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 1,774 आहे.