मालेगावचा पुढचा आमदार कोण? संजय राऊत यांनी नाव घेऊनच सांगून टाकलं; दादा भुसे यांना कुणाचं आव्हान असणार?
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मालेगाव दौऱ्यावर येत असून त्यांची जाहीर सभा होणार आहे. मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा असतांना संजय राऊत यांनी नाव सांगून टाकलं आहे.
मालेगाव ( नाशिक ) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या ( रविवारी, 26 मार्च ) ला मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. कोकण विभागानंतर मालेगाव येथे उत्तर महाराष्ट्राची सभा होणार आहे. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर संपूर्ण विभागात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दौऱ्यावर आहेत. सभेच्या पूर्वीच्या तयारीचा जोरदार आढावा घेतला जात आहे. त्याच दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ही सभा ऐतिहासिक सभा होणार असल्याचा दावा करत असतांना मालेगाव बाह्यचा पुढचा आमदार कोण असेल हे जाहीर करून टाकले आहे.
संजय राऊत यांनी यावेळेला दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दादा भुसे यांच्यावर टीका करत असतांना दादा भुसे हे चोर आहेत, पळून गेले म्हणत संजय राऊत यांनी पुढील आमदार हे अद्वय हिरे असतील असं जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे अद्वय हिरे हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं एकप्रकारे जाहीर करून टाकलं आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात अद्वय हिरे यांनी प्रवेश केला होता. त्यामध्ये दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल करत संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सांगून टाकले होते. त्यानंतर अद्वय हिरे यांची उपनेते पडी निवड करण्यात आली होती.
त्याच पार्श्वभूमीवर अद्वय हिरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. त्यामुळे मंत्री दादा भुसे यांना अद्वय हिरे यांचे आव्हान असणार असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर अद्वय हिरे हे धुळे लोकसभा लढवणार असे बोलले जात होते.
त्यामुळे अद्वय हिरे की आमदारकी की खासदारकी लढवणार अशी चर्चा असतांना संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर अद्वय हिरे दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना पाहायला मिळणार आहे.
मंत्री दादा भुसे यांच्याच मतदार संघात ही सभा होणार असल्याने दादा भुसे यांनाच उद्धव ठाकरे सुरुंग लावणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सभेला उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.