‘माझे वडील शांततेचं अपील करत असताना…’, विजय वाकोडे यांच्या मुलाने मनोज जरांगे यांच्याकडे व्यक्त केली खंत
मनोज जरांगे पाटील यांनी दिवंगत आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. वाकोडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यांचे पुत्र आशिष यांनी जरांगे पाटील यांना घटनेची माहिती दिली. यावेळी आशिष वाकोडे यांनी पोलीस कारवाईवर खंत व्यक्त केली.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिवंगत आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. विजय वाकोडे आंबेडकर चळवळीचे नेते होते. त्यांचा 16 डिसेंबरला हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. वाकोडे परभणीत संविधान विटंबना नंतर झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. मनोज जरांगे यांनी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी देखील मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला.
“माझे वडील शांततेचं अपील करत असताना माझ्या वडिलांना एक नंबरचा आरोपी केले. माझ्या वडिलांनी 40 वर्षे समाजाचं काम केलं. परभणीचे दोन्ही प्रकरण आपण लावून धरू”, असं विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे मनोज जरांगे यांना म्हणाले. यावेळी एक कार्यकर्ता देखील मनोज जरांगे यांच्याकडे आपली भावना बोलू लागला.
‘शहिदांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जातंय तर ते त्यांना पर्यटन वाटतंय’
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले परभणी, बीड पर्यटन क्षेत्र झाले आहे. मुख्यमंत्र्यापर्यंत पूर्ण माहिती दिलेली आहे. घटनेनंतर वेगळं वळण देण्यात आलं. संविधान विटंबना प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही. तुम्ही आणि राहुल गांधी येऊन गेल्यानंतर इतर समाजामध्ये चांगला मेसेज गेला. शहिदांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जात आहे. तर ते त्यांना पर्यटन वाटत आहे”, अशी भावना एका कार्यकर्त्याने मनोज जरांगे यांच्याकडे मांडली.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी आपण परभणीचे दोन्ही प्रकरणं लावून धरू, असं आश्वासन दिलं. यानंतर मनोज जरांगे पाटील बीडच्या मस्साजोग गावच्या दिशेला रवाना झाले. याआधी मनोज जरांगे यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवर जरांगे काय म्हणाले?
“परभणीमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दु:खदायी आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन यामध्ये जे दोषी असतील त्या पोलीसवाल्यांवर देखील कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यांच्यासाठी लढाई लढू आणि रस्त्यावर उतरू”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.