Tv9 Exclusive : कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्या? तुमचा जिल्हा यात आहे का?; पाहा सविस्तर आकडेवारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. विशेष म्हणजे विविध जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 55 हजार पेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव आणि धुळे जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी सापडल्या आहेत.
मोहन देशमुख, संदीप जाधव, Tv9 मराठी, मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीय. त्यानंतर राज्य सरकारची समिती संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगाने सुरु आहे. प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कामातून किती कुणबी नोंदी सापडल्या याची जिल्हानिहाय आकडेवारी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 57 हजार 688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 45 हजारापेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. तर धुळे जिल्ह्यात 31 हजार 453 नोंदी सापडल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात मराठा कुणबी दाखले अभिलेख तपासण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल 10 लाख अभिलेखांची तपासणी झाली. यामध्ये 2211 इतक्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कुणबी नोंदी सापडलेल्यांना दाखले देण्याच्या सूचना केल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 29 हजार पुरांव्याची तपासणी झालीय. यामध्ये तब्बल 31 हजार 453 नोंदी या कुणबी समाजाच्या आढळून आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 56 हजार 688 कुणबी नोंदी प्रशासनाला सापडल्या आहेत. या शोध मोहिमेत मोडी अभ्यासकांची मोठी मदत होत आहे. लिप्यांतर सॉफ्टवेअरचा आणि मोडी किरण पुस्तकाची मदत घेतली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यात महसूल, शैक्षणिक, भूमी अभिलेख यासह विविध विभागात 5 लाख 90 हजार 28 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यात 45 हजार 728 नोंदी कुणबी जातीच्या आढळून आलेल्या आहेत. 1948 ते 1967 आणि 1948 पूर्वीच्या नोंदी अभिलेखावर तपासण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील भूमी अभिलेख कार्यालयात आजही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. इथे आतापर्यंत एकूण 44 नोंदी साडल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील रिकटोली आणि आकले गावातील या नोंदी आढळल्या आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्या?
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 932 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- जालना जिल्ह्यात 2764 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- परभणी जिल्ह्यात 1466 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- हिंगोली जिल्ह्यात 3130 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- बीड जिल्ह्यात 3994 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- नांदेड जिल्ह्यात 389 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- लातूर जिल्ह्यात 363 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- धाराशिव जिल्ह्यात 459 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यात 57,688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- धुळे जिल्ह्यात 31,453 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- कोल्हापूर जिल्ह्यात 5566 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- रत्नागिरी जिल्ह्यात 69 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- पुणे जिल्ह्यात 20,000 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- सांगली जिल्ह्यात 2211 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- सोलापूर जिल्ह्यात 2187 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
- जळगाव जिल्ह्यात 45,728 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.