कामगारांना 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये, सहकार व पणन मंत्र्यांचे निर्देश
'बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या, शेतमालाची माथाडी कामगारांकडून चढ-उतार करणे आरोग्यांच्या दृष्टीने घातक आहे. माथाडी कामगारांकडून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधून मालाची चढ-उतार होणार नाही, या बाबत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी'.
मुंबई : विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीरस्वास्थ्याला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करू नये, असे निर्देश सहकार व पणन मंत्री (Minister for Co-operation and Marketing) बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिले आहेत. मंत्रालयात बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना 50 किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पाटील यांनी संबंधित यंत्रणांना हे निर्देश दिले आहेत.
या बैठकीनंतर पाटील म्हणाले, बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या, शेतमालाची माथाडी कामगारांकडून चढ-उतार करणे आरोग्यांच्या दृष्टीने घातक आहे. माथाडी कामगारांकडून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधून मालाची चढ-उतार होणार नाही, या बाबत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर राज्यातून येणारा माल असतो. त्या संबंधित राज्याला सुध्दा 50 किलोपेक्षा अधिक गोण्या भरू नये अशा सूचना द्याव्यात आणि पणन व कामगार विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना यासंदर्भात कळवावे. त्याचबरोबर स्थानिक जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत अधिक जन जागृती करावी असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, अन्य अधिकारी, माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा पाटील, किराणा बाजार दुकाने मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ,व्यापारी राजीव मणियार व कामगार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नोव्हेंबरमध्ये बाजार समिती, संघटनांमध्ये तोडगा
बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या गोणीचे वजन किती असावे यावरुन मुंबई बाजार समिती प्रशासक आणि संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यावर तोडगा निघाला असून आता 50 किलोचीच गोणी उतरुन घेतली जाणार आहे. गेल्या दीड वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करून तोडगा काढण्यात आला. तर शेतकरी आणि 305 बाजार समित्यांमध्ये जनजागृतीसाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या भागातून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी येतात त्या ठिकाणी जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
गोणी वजनाबाबत सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे माथाडी कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला असून आता याबाबत सर्व बाजार समित्यांमध्ये जनजागृती केली जाणार, असा निर्णय घेण्यात आला होता.
इतर बातम्या :