भुजबळ यांना धमकी आली, पोस्टर फाडले; राष्ट्रवादीचा मंत्री म्हणाले, ‘बात का बतंगड’
अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. मंत्री भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त येवल्यात लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर फाडण्यात आलेत. बॅनरवरील भुजबळ यांच्या फोटोला काळे फासण्यात आलेय. यावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याने मोठे विधान केलंय.
जळगाव : 15 ऑक्टोबर 2023 | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादाने पेट घेतला. भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या सभेचा खर्च काढला. तर, जरांगे पाटील यांनी अजितदादा पवार जरा छगन भुजबळ यांना समज द्या. ते माझ्या नादी लागले तर मग मी सोडत नसतो असं म्हणत भुजबळ यांना इशारा दिला होता. यातच भुजबळ यांना अनेकवेळा धमकीचे फोन आणि मेसेज आले. ‘तू जिवंत राहणार नाही. तुझी वाट लावू’, अशी धमकी त्यांना देण्यात आली. तर येवला या छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात त्यांचा वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर फाडत तोंडावर काळे फासण्याची घटना घडली. येवल्यातील अंगणगाव येथे हा प्रकार घडला.
मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच हा प्रकार घडला. मराठा समाजाच्या वाढत्या विरोधामुळे भुजबळ यांची डोकेदुखी वाढलीय. मराठा समाजाच्या आरक्षणावरून मंत्री भुजबळ हे एकाकी पडल्याचे चित्र दिसत असताना राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील त्यांच्या समर्थनासाठी उभे ठाकले आहेत.
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी तसेच त्यांचे बॅनर फाडल्याच्या विषयावर मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. छगन भुजबळ यांना धमकी आली असेल तर या धमकीच्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. मराठ्यांना आरक्षण देऊ नये असे आजपर्यंत छगन भुजबळ कधीच म्हणाले नाहीत. ओबीसींचे आरक्षण कमी करू नये हा त्यांचा आग्रह आहे, असे मंत्री अनिल पाटील म्हणाले.
भुजबळ साहेब यांना काय बोलायचे होते ते कुणी जाणून घेतले नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा सोयीनुसार अर्थ काढण्यात आला. मराठा आरक्षणासाठी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत आमच्यासारखे कार्यकर्ते काल ही काम करत होते आणि आजही काम करत आहेत, उद्याही करत राहणार असे त्यांनी सांगितले.
मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे आणि ओबीसींचे आरक्षण टिकले पाहिजे असं छगन भुजबळ साहेब यांचे म्हणणे आहे. त्यात काही वावगं आहे असे मला वाटत नाही. छगन भुजबळ यांना देण्यात आलेली जीवे मारण्याची धमकी आणि त्यांचे बॅनर फाडण्याचा प्रकार म्हणजे भुजबळ साहेबांची कुठलीही चूक नसताना बात का बतंगडा केला जात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.