क्रेनद्वारे फुलांचा हार, शुभेच्छांचा वर्षाव! औरंगाबादेतही धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले धनंजय मुंडे परतत असताना औरंगाबादेत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजीही केली.
औरंगाबाद : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्कारासारखी गंभीर तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर आता मुंडे यांचं जागोजागी जंगी स्वागत करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले धनंजय मुंडे परतत असताना औरंगाबादेत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडेंच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजीही केली.(Dhananjay Munde was warmly welcomed by Party workers in Aurangabad)
धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तिथून परतत असताना ते संध्याकाळच्या सुमारास औरंगाबादे पोहोचले. त्यावेळी चिखलठाणा चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि मुंडे समर्थकांनी त्याचं जंगी स्वागत केलं. क्रेनच्या सहाय्याने मुंडे यांना मोठा फुलाचा हार घालण्यात आला. मुंडे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठीही तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती.
रेणू शर्मा या पार्श्वगायिकेनं धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पण पुढे रेणू शर्मा यांनी ही तक्रार मागे घेतली. या तक्रारीमुळं धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलं होतं. पण रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर मतदारसंघासह राज्यभरात त्यांचं जंगी स्वागत होत आहे.
जेसीबीतून फुलांची उधळण
प्रजासत्ताक दिनी धनंजय मुंडे जेव्हा शिरुर कासार इथं दाखल झाले होते त्यावेळी त्यांच्यावर जेसीबी मशीनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर एक भला मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालण्यात आला. कार्यकर्त्यांकडून झालेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे धनंजय मुंडे भारावल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.
..तरी उपकार फिटणार नाहीत – मुंडे
‘तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. हे आशीर्वाद म्हणजे एखाद्या भगवंताचा प्रसादच आहे. अशा कठीण काळात आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिलात. त्याबद्दल मी शब्दात आभार व्यक्त करु शकत नाही. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली. आजपर्यंत अनेक संकटाला सामोरा गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे,’ अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले होते.
संबंधित बातम्या :
Dhananjay Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत
‘अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला घातले तरी उपकार फिटणार नाहीत’, धनंजय मुंडे भावनाविवश
Dhananjay Munde was warmly welcomed by Party workers in Aurangabad