मंत्री शंभूराजे सांगत होते मुख्यमंत्री शिंदे यांचे कर्तृत्व, अजित दादा यांच्या कानाला मात्र हेड फोन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतकु करणारे ट्विट केले. विशेष म्हणजे हे ट्विट त्यांनी मराठीतून केले याकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष वेधले.
मुंबई । 24 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच महिन्यात पाच वेळा दिल्ली वारी केली. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकीकडे अजित दादा समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवली अशी चर्चा आहे. त्यातच मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल एक ट्विट केले आहे. याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व सांगत असताना अजित दादा मात्र कानात हेड फोन लावून बसले होते.
विधानसभेत सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट केले. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे गतीशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री असा केला आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शिंदे यांची तळमळ, त्यांचा विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटवमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांचे हे ट्विट मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणारे आहे. यामुळे महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे. कर्तबगार मुख्यमंत्री राज्याला लाभला त्यामुळे त्यांचे कौतुक करणे आमचे कर्तव्य असल्याचे मंत्री देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या या कौतुकाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. पंतप्रधान यांच्या मताशी एकनाथ शिंदे यांचे सहकारी, त्यांना जवळून ओळखणारी प्रत्येक व्यक्ती सहमत होईल यात शंका नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा ते आचरणात आणत आहेत, असे देसाई म्हणाले.
चिखल, पावसाची पर्वा न करता दीड तास उभा डोंगर चढून गेलेला मुख्यमंत्री यापूर्वी आपण पाहिला नसेल. इतकंच नव्हे तर तिथे थांबून मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. यंत्रणेत समन्वय ठेवला. बाळासाहेब ठाकरे म्हणाययचे मला घरात बसणारा कार्यकर्ता नको रस्त्यावर उतरणारा, सामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता हवा, तेच मुख्यमंत्री यांनी अंमलात आणले असेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
मागील काही दिवसांपासून अजित पवार लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेेणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, विधानसभेत देसाई यांचे प्रस्तावाचे निवेदन सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र हेड फोन लावून शांतपणे ते भाषण ऐकत होते. राष्ट्रवादीचे मंत्रीही शंभूराज देसाई यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत होते. तर भाजपचे मंत्री, आमदार बाके वाजवून त्यांना समर्थन देत होते.