MNS Assembly Candidate List : विधानसभेसाठी मनसेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर
मोठी बातमी समोर येत आहे, मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 15 उमेदवारांचा समावेश आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, तर चार नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपली पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या पाचव्या यादीमध्ये एकूण 15 उमेदवारांचा समावेश आहे.
मनसेच्या उमेदवारांची यादी
मेहकरमधून भैय्यासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव जामोद अमित देशमुख, उमरेड शेखर टुंडे, गंगाखेड रुपेश देशमुख, सोलापूर मध्यमधून नागेश पासकंटी, परांडा राजेंद्र गपाट, फुलंब्री बाळासाहेब पाथ्रीकर,उस्मानाबाद देवदत्त मोरे, बीड सोमेश्वर कदम, काटोल सागर दुधाने,श्रीवर्धन फैझल पोपेरे आणि राधानगरीमधून युवराज येडुरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अमित ठाकरेंसाठी शिवसेना नेत्यांची फिल्डिंग
दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेच्या पहिल्याच यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. या मतदारसंघातून शिनसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे रिंगणात आहेत. मात्र अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेना नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, परंतु मी माघार घेणार नसून, येत्या 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.