Raj Thackeray : ‘एकत्र येणं, एकत्र राहणं, यात…’, उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंच सर्वात मोठं वक्तव्य
Raj Thackeray : आजही अनेकांना प्रश्न पडतो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? मराठी माणसांच्या हितासाठी या दोन बंधुंनी एकत्र यावं, अशी अनेकांची इच्छा आहे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे या बद्दल बोलले आहेत. अजूनही तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. तिथे बोलताना त्यांनी भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? या बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे”
“या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर म्हणाले.
‘मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही’
“माझी तर इच्छा आहे की, महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाच्या सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन पक्ष काढावा” अजूनही एकत्र येऊ शकता का? शिंदे सेना म्हणजे शिवसेना तू टेकओव्हर करायला हरकत नव्हती असा प्रश्न महेश मांजरेकरांनी त्यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, ‘मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही’, “शिंदे फुटणं, आमदारांसोबत बाहेर जाणं हा वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी आमदार-खासदार माझ्याकडे आलेले. त्यावेळी सुद्धा मला शक्य होतं. पण बाळासाहेब सोडून कोणाच्याही हाताखाली मी काम करु शकत नाही. त्यावेळी शिवसेनेत होतो. उद्धवसोबत काम करायला हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का, मी सोबत काम करावं”
त्यावर महेश मांजरेकर म्हणाले की, महाराष्ट्राची इच्छा आहे. “मग, महाराष्ट्राने त्यांना सांगाव. अशा छोट्या, छोट्या गोष्टींमध्ये मी माझा इगो आणत नाही” असं राज ठाकरे म्हणाले.