मुख्यमंत्रीपदासाठी मोदी-शाहांची या नावाला पसंती, या दिवशी शपथविधी?
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं असलं तरी मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतच ठरवलं जाणार आहे. भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने आपलाच मुख्यमंत्री व्हावा अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता तर मोदी-शाहांनी मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं देखील बोललं जात आहे.
230 आमदारांचं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर, आता पुढच्या 2 दिवसांत भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली होणार आहेत. TV9 ला मिळालेल्या माहितीनुसार, 48 तासांत दिल्लीतून 2 निरीक्षक येणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह आणखी एक जण निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात येणार आहेत. आणि 29 तारखेला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नेता निवडला जाईल. जो मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल. अर्थात फडणवीसांच्याच नावाला, मोदी शाहांनी पसंती दिल्याची माहिती आहे.
TV9ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री असतील. तसंच 3 मुख्य खात्यांपैकी, गृहखातं फडणवीसांकडेच असेल. याआधी 2014 मध्ये मुख्यमंत्री आणि अडीच वर्षांआधी उपमुख्यमंत्री झाल्यावरही गृहखातं फडणवीसांनी स्वत:कडेच ठेवलं होतं. तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं आणि अर्थखातं पुन्हा अजित पवारांना दिलं जाणार असल्याचं कळतं आहे.
शपथविधी कधी?
शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची नेता म्हणून निवड झालीय. तर राष्ट्रवादीकडूनही अजित पवारांची नेता म्हणून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांनी निवड केलेली आहे. 29 तारखेला भाजपच्या आमदारांच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर 29 तारखेलाच किंवा 2 तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत एकूण 20 जणांचा शपथविधी होणार असल्याचं कळतंय. भाजपचे 10 मंत्री, शिंदेच्या शिवसेनेचे 6 आमदार तर अजित पवारांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. महाराराष्ट्रात एकूण 43 मंत्री करता येतात. त्या 43 पैकी भाजपला 23-25 मंत्रिपदं, शिंदेंच्या शिवसेनेला 9-10 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8-9 मंत्रिपदं मिळू शकतात.
गेल्या अडीच वर्षात फक्त तीसच मंत्री होते. इच्छुकांची संख्या पाहता आणि आमदार सोबत राहावेत म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेत कोट शिवून तयार असलेल्या गोगावलेंनी आता मंत्री होणारच असल्याचं म्हटलंय. तर प्रकाश सुर्वेंनाही मंत्री होण्याची इच्छा आहे.
महायुतीत सत्तास्थापना आणि इच्छुकांच्या मंत्रिपदावरुन घडामोडी सुरु आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न सुरु आहेत. अर्थात महाविकास आघाडीतून कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकत नाही. कारण कोणत्याही एका पक्षाकडे 29 आमदारांचं संख्याबळ असावं लागतं.
महायुतीकडे 230 आमदारांचं संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे 49 आमदार आहेत. त्यामुळं विरोधकांचा आवाज विधानसभेत कमी असेल.