MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी गूडन्यूज, राज्य सरकारची तब्बल 6 हजार जागा भरण्याची मागणी
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती होणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे.
मुंबई : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी (MPSC Exam) मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच राज्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती (Job) होणार आहे. कारण राज्य सरकारच्या विविध विभागात गट-अ, गट-ब आणि गट-क च्या जागा भरण्यासाठी मागणीपत्र दिलं आहे. यात तब्बल 6 हजार 356 जागा भरण्याची गरज असल्याचे मागणीपत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी आयोगाला राज्य सरकारने (Government Job) तसं मागणीपत्र दिलंय. कोणत्या विभागात किती जागा भरणार याबाबत परिपत्रकही प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे लवकरच मोठी भरती निघणार आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी आणि बरोजगार तरुण, तरुणींसाठी ही सर्वात मोठी गूड न्यूज आहे. येत्या काही दिवसातच त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थीही आता परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.
मोठ्या संख्येने पदं रिक्त
राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी केला होता. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार ? मागील सरकारच्या काळातही नोकर भरती केली गेली नाही. ह्या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्याच धर्तीवर आता राज्याने तातडीने पाऊलं उचलायला सुरूवात केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ
कोरोनामुळे मागील दोन वर्षात पदभरती झालेली नाही. शासन ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले होते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय कोरनामुळे देशोधडीला लागले आहेत. असातच नोकरभरती रखडल्याने अनेकांसमोर रोजगाराचा सवाल उपस्थित झाला आहे. लवकरात लवकर नोकरभरती झाल्यास अनेकांच्या हाताला काम मिळून अनेकांचे जीवन पुन्हा उजळू शकते. त्यामुळे शासनही जोमाने कामाला लागले आहे.