लाडका भाऊ योजनेतून कुणाला किती पैसे मिळणार? तरुणांच्या थेट बँक खात्यात जमा होणार
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी तीन प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, आय.टी.आय किंवा डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार मोफत प्रशिक्षण देत आर्थिक मदत करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता माझा लाडका भाऊ योजनेचीदेखील घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचं अर्थसंकल्प सादर केलं. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेवरुन विरोधकांकडून फक्त महिलांसाठीच योजना का जाहीर केली? म्हणून आक्षेप घेतला जात होता. महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी सरकार का काही करत नाही? असा सवाल विरोधकांकडून केला जात होता. यानंतर अखेर विरोधकांचा हा आक्षेप लक्षात घेत राज्य सरकारने राज्यातील बेरोजगारांसाठीदेखील मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सुरु केली आहे.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणमधून तरुणांना पुढची नोकरी मिळावी यासाठी ट्रेन करणार आहे. विशेष म्हणजे सहा महिने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुणांना आगामी काळात राज्य सरकार नोकरी देखील मिळवून देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून बेरोजगार तरुणांना 6 महिने वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत अप्रेंटिसशिप मिळणार आहे. त्या मोबदल्यात संबंधित कारखान्यांमधून तरुणांना सहा महिने प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे. याशिवाय सरकार या तरुणांच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे टाकणार आहे. राज्य सरकार या माध्यमातून बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.
कुणाला किती पैसे मिळणार?
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणांसाठी तीन प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, आय.टी.आय किंवा डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे. सरकार लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करुण देणार आहे. तसेच प्रत्येकाला दर महिन्याला सरकारकडून प्रशिक्षणार्थी पैसे दिले जाणार आहेत.
यातील 12 उत्तीर्ण तरुणांना महिन्याला 6 हजार रुपये मिळतील. तर आय.टी.आय किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला 8 हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना दर महिन्याला 10 हजार रुपये पैसे सरकारकडून मिळणार आहेत. सरकार लाभार्थी तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
योजनेसाठी नेमकी पात्रता काय?
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिली अट म्हणजे अर्ज करणारा तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
- या योजनेचा लाभ किंवा महाराष्ट्राचे विद्यार्थी किंवा तरुण पात्र असतील. त्याचे वय केवळ 18 ते 35 वर्ष वय इतक्या दरम्यान असणे अपेक्षित आहे.
- लाभार्थी तरुणाचं शिक्षण हे किमान 12 वी पास किंवा आय.टी.आय, डिप्लोमा किंवा पदवीधर असणं अपेक्षित आहे.
- सर्वात महत्त्वाची आणखी एक अट म्हणजे अर्जदाराचं बँक खातं हे आधार कार्डशी संलग्न किंवा जोडलेले असायला हवं.
- अर्जदार हा विद्यार्थी नसावा. त्याचं शिक्षण सुरु नसावं. तसेच तो फक्त बरोजगार असावा.
- या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.