संजय राऊत म्हणाले, मंत्रिमंडळात गँगवॉर; हसन मुश्रीफांचं उत्तर, म्हणाले …तर आम्ही राजीनामा देऊ!
Hasan Mushreef on Sanjay Raut : संजय राऊतांना आतापर्यंत लक्षात आलं असेल अजित पवार गटाची बाजू खरी आहे. त्यामुळे ते काही गोष्टी बोलत आहेत, असं मुश्रीफ म्हणालेत. संजय राऊतांच्या टीकेला हसन मुश्रीफ यांचं उत्तर; म्हणाले, ...तर आम्ही राजीनामा देऊ! वाचा सविस्तर...
मुंबई | 09 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळात गँगवॉर सुरु असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्याला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे. असा कोणताही वाद झाला नाही. सगळ्याच मंत्र्यांनी संयमाने बोलावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितलं आहे. अंगावर धावून जाणं वगैरे असं काही झालं नाही. संजय राऊत सिद्ध करु शकले तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.
संजय राऊत काय म्हणाले होते?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री संजय राऊतयांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून घमासान सुरू आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये हा महाराष्ट्राचा जातीपातीमध्ये तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये कमजोर अस्थिर सरकार बसलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी जुमानत नाही. कॅबिनेटमध्ये गॅंगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाहीत. तर राज्याच्या प्रमुखपदी बसण्याचा त्यांना अधिकार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
“राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आमचंच”
राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याबाबत आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी होणार आहे. यावर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पक्षाचं काय होणार हे निवडणूक आयोग ठरवेल. आमचा दावा हा घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षावर आहे. त्यासाठी पुरावे आम्ही दिले आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह आमचंच आहे, असं मुश्रीफ म्हणालेत.
छगन भुजबळ यांनी आरक्षणाप्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरही मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं, अशी सर्वांचीच मागणी आहे. त्यामुळेच आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दिलं आहे. ज्यांना कुणबी दाखले आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण द्यावं, असं भुजबळ देखील बोलले आहेत. त्यामुळे कोणताही वाद नाही. कुणीही गैरसमज करुन घेऊ नये, असंही मुश्रीफ म्हणालेत.