‘मुंबई प्रदेश सर्वांना स्वीकारणारा, जे झालं ते…’ मंत्री उदय सामंत ‘त्या’ महिलेच्या भेटीला
तृप्ती देवरुखकर यांची भेट घेतल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. गुजराती आणि मराठी यामध्ये जो प्रकार काल झाला ते योग्य नाही असे ते म्हणाले. महाराष्ट्र असेल, मुंबई असेल हा प्रदेश सर्वांना स्वीकारणार आहे.
मुंबई : 28 सप्टेंबर 2023 | मुलुंड येथील सोसायटीमध्ये ऑफीससाठी जागा बघायला गेलेल्या मराठी महिलेला नकार देण्यात आला. त्या महिलेने या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याचे मुंबईत तीव्र पडसाद उमटले. ऑफीससाठी नकार देणाऱ्या पिता पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी देवरुखकर कुटुंबाची भेट घेतली. देवरुखकर यांच्या सासऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी तृप्ती देवरुखकर यांनी सासरे हे बाळासाहेब ठाकरे यांना खूप मानत असल्याचे सांगितले. अनेक जाती धर्माची लोक येथे राहतात. जातीपातीमध्ये अस्पृश्यता निर्माण करणे हे कितपत योग्य आहे याचा प्रत्येकाने विचार केला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.
सोसायटीच्या सर्व सदस्यांनी याचा विचार केला गेला पाहिजे. 100% पैकी 99 टक्के सोसायटी हे सर्वांना सामावून घेत असतात. अशा एक टक्का घटना सर्वाना बदनाम करत असतात. त्याची दखल घेतली पाहिजे. या सर्वांची दखल घेत शासनाचा प्रतिनिधी म्हणून देवरुखकर कुटुंबाची भेट घेतली असे त्यांनी सांगितले.
मराठी माणूस असेल किंवा इतर धार्मिक जातीचा माणूस असेल तो स्वतःच्या उपजीविकेसाठी मुंबई येत असतो. जातीपातीसाठी राजकारण कशाला करता. सर्वांनी एकत्र आले पाहिजे. स्वतःहून जातीपातीची भिंत उभा करणे हे चुकीचं आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दखल घेतली आहे, असे उदय सामंत म्हणाले.
वरळीमध्ये ‘केम छो वरळी’ असे बॅनर्स लागले आहेत. पण असे जे कुणी राजकारण करत आहेत. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ आहे. सकाळी आमच्याबाबत बोलायला सुरुवात करतात ते रात्री झोपेपर्यंत बोलतात. आज ज्या कामासाठी आलो त्यांना मी भेटलोय त्यांना उत्तर देण्यासाठी राजकीय व्यासपीठ आहे, असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत याचं ट्विट आणि याचा देवरुख कुटुंब याचा संबंध काय? त्यांच्या उत्तराला उत्तर देणे आता योग्य नाही. त्या गोष्टीला राजकारणाचा स्पर्श करण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने तृप्ती देवरुखकर यांनी त्या वयस्कर व्यक्तीशी अभद्र बोलणं सुरू होतं. पण, या पद्धतीने जे काही बोलले ती वाईट गोष्ट होती.
तृप्ती देवरुखकर यांच्यासोबत सोसायटी भांडली नाही. ती फक्त एक व्यक्ती त्यांच्यासोबत भांडली. त्यांचा मुलगा भांडला. ते अजिबात योग्य नाही. मग तो सेक्रेटरी असो वा अध्यक्ष असो. पोलिसांकडुन याची माहिती घेतली आहे. सोसायटीचे ते म्हणणं नाही. सोसायटी त्यांना जागा द्यायला तयार आहे. त्यामुळे एका व्यक्तीचे म्हणणं सोसायटीचे म्हणणं असे होत नाही. यामागे कुणी बोलवता धनी नाही. त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. यात राजकारणाचा संबंध असता तर प्रशासन म्हणून देवरुखकर कुटुंबाची भेट घेतली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले.