Mumbai Rains Update : मुंबईच्या शाळांना पावसाचा विळखा, दोन्ही सत्रात शाळांना सुट्टी, लोकल ठप्प झाल्याने चाकरमानीही अडकले
राज्यभरासह मुंबईतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रविवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबईत तुंबली असून त्यामुळे मुंबईचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून सकाळपर्यंत अवघ्या ६ तासांमध्ये तब्बल 300 मिमी पावसाची नोंद झाली
राज्यभरासह मुंबईतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रविवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबई तुंबली असून त्यामुळे मुंबईचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून सकाळपर्यंत अवघ्या ६ तासांमध्ये तब्बल 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने मुंबईची लाईफलाइन असलेली लोकलही विस्कळीत झाली आहे. दरम्यान या पावसाच्या पाण्याने शाळांनाही विळखा घातला असून शहरातील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
रविवार रात्रीप्रमाणेच आज ( सोमवार) दिवसभरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील (BMC क्षेत्र) सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता दिवसभरातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १.५७ वाजता समुद्रात ४.४० मीटर उंच भरती आहे.या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान चेंबूरच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या परिसरातही घुडगाभर पाणी साचल्याने शाळेकडून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र सकाळपासून पाण्याचा निचरा होत नसल्याने आसपासच्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
#WATCH | Commuters face trouble as traffic movement is disrupted due to waterlogged roads in Sion area of Mumbai due to heavy rains pic.twitter.com/mww9TCA40j
— ANI (@ANI) July 8, 2024
कुठे किती झाला पाऊस ?
मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक 8 जुलै 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजेपासून सकाळी 7 वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण.
– वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)
– एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)
– मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)
– चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)
– आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)
– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)
– नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)
– जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)
– प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)
– नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)
– लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)
– शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)
– रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)
– धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)
– बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)
राज्यात पावसाचा जोर वाढला
शनिवारपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढला असून, मुंबई, तसेच उपनगर, ठाणे, कोकण, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाला सुरूवात झाली. शहरातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून, पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई लोकल रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. मध्य रेल्वे मार्गावर अनेक लोकल तसेच एक्स्प्रेस ट्रेनस्ही रुळांवर अडकून पडल्या आहेत. रेल्वेसेवा विस्कळीत जाल्याने कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे सुरू नसल्याने अनेकांनी पर्यायी मार्ग म्हणून बसकडे धाव घेतली मात्र बस स्थानकावरही प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे.
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
पावसाचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली आहे. मुंबईतील एलबीएस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पाण्याचा निचकरा न झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा एलबीएस मार्गावर लागल्या असून बरेच प्रवासी अडकून पडले आहेत. काही ठिकाणी वाहनंही बंद पडली आहेत. एकंदरच मुसळधार पवासाचा फटका बसल्याने मुंबईकरांचं जीवन संपूर्णपणे विस्कळीत झाल्याच चित्र आज सर्वत्र दिसत आहे.