संजय राऊतांकडून शिंदे-फडणवीसांचा ‘सुलतान’ असा उल्लेख; म्हणाले, राज्यातील सरकार नामर्द!
Sanjay Raut on CM Eknath Shinde Devendra Fadnavis :प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की नेत्याने मुख्यमंत्री व्हावं. आम्हाला देखील वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हावं. 31 डिसेंबर नंतर तशी जागा रिकामी होणार आहे. त्या जागेवर अजित पवार बसले तर आम्हाला देखील आनंद होईल, असं संजय राऊत म्हणालेत.
गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ‘सुलतान’ असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील सामान्य माणूस संकटात आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक पर्यटन सुरु आहे. राज्यातील सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग आहेत. इकडून तिकडे खोके पोहोचवणं हेत या सुलतानांचं काम आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतायेत. नाशकापासून नंदुरबारपर्यंत अशीच स्थिती आहे. द्राक्ष गेली आहे. कापूस, फळबागा गेल्या आहेत. पण राज्यातील सरकार कुठंय? आसमानी संकट कोसळत असताना हे सुलतान प्रचारात दंग आहेत. छत्तीसगढ, हैदराबाद, जयपूर, निवडणूक पर्यटन सुरू आहे. आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर हे लोकांच्या भेटी घेत आहेत. आमचे नेते मात्र अगोदरपासून दौरा करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
शिंदे सरकारवर घणाघात
अवकाळी पाऊस कोसळतोय. विदर्भ, नाशिक, कोकण, ठाणे जिल्ह्यातही मोठं नुकसान झालंय. हे संकट कोसळताना मुख्य सुलतान डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त आहेत. जसं काय हे गेले नाहीत तर निवडणूक थांबणारच आहेत! मुख्य जबाबदारी इथून खोके न्यायची होती. विधानसभा अधिवेशन होईल. प्रश्न निर्माण होतील मग आज गेलेत. इथं राजाच नौटंकी आहे, असं म्हणत राऊतांनी सरकारवर घणाघात केला आहे.
दत्ता दळवी तुरुंगात आहेत.. दोन-चार लोक आले. त्यांनी दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या. ही त्यांची मर्दानगी… भाड्यानं माणसं घेतात… दत्ता दळवी बाहेर येतील. जर खरा मर्द असेल तर गाडी फोडून तिथंच थांबा. पळून का जाता थांबा ना तिथं… राज्यात नामर्दांचं सरकार आहे, असं म्हणत राऊतांनी टीका केला आहे.