सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे संजय राऊतांपर्यंत, महिनाभरात राऊत तुरुंगात जाणार; कुणी केला दावा
Sanjay Shirsat on Sanjay Raut Salim Kutta Case : पुढच्या महिनाभरात संजय राऊत जेलची हवा खाणार, असा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत असल्याचंही या नेत्यांनं म्हटलं आहे. सलीम कुत्ता प्रकरणी कुणी केला आरोप? वाचा...
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, मुंबई | 18 डिसेंबर 2023 : सलीम कुत्ता प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठं वादंग निर्माण केलं आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या नेत्याने संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची चौकशी होईल आणि संजय राऊत लवकरच तुरुंगात असतील. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यामध्ये राऊत तुरुंगात दिसतील, असं शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
राऊतांवर आरोप काय?
ज्या पद्धतीने सलीम कुत्ता प्रकरण समोर आलं आहे. सुधाकर बडगुजर यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. चौकशी केली जात आहे. महत्वाच्या लिंक यात सापडल्या आहेत. संजय राऊत यांच्या सतत नाशिकला फेर्यात सुरू असतात आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता या प्रकरणांमध्ये त्यांची देखील चौकशी केली जाईल, असंही शिरसाट म्हणालेत.
हे वारंवार असं भासवण्याचा प्रयत्न करत होतो आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी सलीम कुत्ताचे तार आहेत. पण मी डंके की चोटपर सांगतो की, उद्धव ठाकरे यांचे कोणतेही संबंध सलीम कुत्ताशी नाहीयेत. हे संबंध केवळ आणि केवळ संजय राऊत यांचेच आहेत. संजय राऊतांची बडबड लवकर बंद होणार आहे, असं म्हणत शिरसाट यांनी संजय राऊतांवर घणाघात केला आहे.
सलीम कुत्ता कोण आहे?
सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा सध्या पुण्यातील येरवडा जेलमध्ये आहे. सध्या राज्यभर चर्चेत असलेला दाऊदचा हस्तक 2016 पासून पुण्यातील येरवडा कारागृहात बंद आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटात सह आरोपी असलेला सलीम कुत्ता 2016 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. 2016 च्या आधी सलीम नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत होता. नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असतानाच कुत्ता पॅरोलवर सुटला होता. तेव्हा डान्स करतानाचा जो व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. तो त्याच वेळेचा असल्याचा देखील बोलले जात आहे. 2016 नंतर येरवडा जेल मधून तो पॅरलवर कधीच सुटला नसल्याचा देखील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा ठाकरे गटाच्या नेत्यावर आरोप
1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात याच सलीम कुत्ताने स्फोटकं पुरवली होती. बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकांचा मुंबईत प्रवेश करण्यासाठी कुत्ताने मदत केली होती. पुण्यातील येरवडा कारागृहात 2016 पासून सलीम कुत्ता अंडा सेलमध्ये आहे. याच सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. राणे यांनी एक व्हीडिओदेखील समोर आणला आहे.