मुंबईत आणखी एका मुलीवर बलात्कार, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई : मुंबईमध्ये सामूहिक अत्याचाराला (Mumbai Gang rape) बळी पडलेल्या मूळच्या जालना येथील तरुणीचा दुदैवी अंत झाला. या धक्कादायक घटनेनंतर नुकतंच अंधेरी पोलीस स्टेशनच्या (Andheri Police station) हद्दीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Mumbai Gang rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे मुंबईत महिला सुरक्षेचा (Women Safety) प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार (Mumbai Andheri Gang rape) केला. या पाच आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अद्याप 2 आरोपी फरार आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. याप्रकरणी रविवारी 1 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना किती तारखेला घडली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील तरुणी मुंबईतील चेंबूरमध्ये तिच्या भावाकडे आलेली होती. 7 जुलै रोजी घरी कुणीही नसताना तिला बाहेर बोलावण्यात आलं आणि चार जणांकडून पाशवी बलात्कार करण्यात आला. या तरुणीला ड्रग्जही देण्यात आले होते. घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रकार घरी सांगितला नाही. मात्र तिचा हात आणि पाय निकामी होत असल्याचं दिसताच तिला अर्धांगवायू समजून उपचार सुरु करण्यात आले. यानंतर तिच्यावर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरु केल्यानंतर त्या तरुणीवर बलात्कार झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
यानंतर सर्व माहिती समोर येत गेली आणि औरंगाबादमध्ये सुरुवातीला गुन्हा नोंद करण्यात आला. मुंबईतील चुनाभट्टीमध्ये हा सर्व प्रकार घडला असल्याने संबंधित विभागाच्या पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी दीड महिना उलटूनही एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागेला नाही.
या दोन्ही घटनांमुळे मुंबई चांगलीच हादरली आहे. एका बाजूला महिला सुरक्षा, सबलीकरण या गोष्टींसाठी सरकार काम करत असताना, दुसरीकडे मात्र अशाप्रकारच्या घटना घडत आहे. यामुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संबंधित बातम्या :
जालन्यातील मुलीवर मुंबईत अमानुष अत्याचार, चौघांकडून सामूहिक बलात्कार
जालना सामुहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक
जालन्यातील मुलीवर चुनाभट्टीत गँगरेप, दीड महिन्यांपासून मुंबई पोलिसांना नराधम सापडेना
चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी SIT नेमणार, पीडितेच्या भावाला संरक्षण
आरोपीची माहिती दिली, पोलिसांनी बलात्कार झालाय हेच मान्य केलं नाही : पीडितेचा भाऊ