पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव 6 व्या मार्गिकेसाठी 29 दिवसांचा मेगाब्लॉक, तब्बल 2,700 लोकल फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम बरीच वर्षे रखडले आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे लांबपल्ल्याच्या ट्रेनसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय लोकलचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत प्रवास करताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. खार ते गोरेगाव दरम्यान 8.8 किमीच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने 7 ऑक्टोबर पासून 5 नोव्हेंबरपर्यंत 29 दिवसांचा मेगाब्लॉक घेतला आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान सुरुवातीच्या 10-13 दिवस फेऱ्या रद्द होणार नसल्या तरी 20 ऑक्टोबरपासून 2700 फेऱ्या रद्द तर 400 फेऱ्या अंशत: रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. लांबपल्ल्याच्या 60 फेऱ्या रद्द आणि 200 अंशत: रद्द होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
अंधेरीचा फलाट क्र.9 बंद
पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम बरीच वर्षे रखडले आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे लांबपल्ल्याच्या ट्रेनसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय लोकलचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे. खार ते गोरेगाव दरम्यान 8.8 किमीच्या मार्गिकेचे काम 7 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे. या कामासाठी 19/20 ऑक्टोबरपासून इंटरलॉकींगचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना अंधेरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र.9 वापरता येणार नाही. ब्लॉकच्या शेवटच्या दिवशी वांद्रे टर्मिनस येथे रुळांच्या कट एण्ड कनेक्शनच्या कामासाठी शनिवार दि.4 नोव्हेंबरच्या रात्री 9 वा. ते रविवार 5 नोव्हेंबरच्या रा.9 वाजेपर्यंत 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
2700 लोकल फेऱ्या रद्द
खार ते गोरेगाव दरम्यान 8.8 किमीच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी या 29 दिवसांच्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या रोजच्या 1,394 उपनगरीय फेऱ्यातून रोज प्रवास करणाऱ्या 30 लाखांहून अधिक मुंबईकरांना 20 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळात 2700 लोकल फेऱ्या रद्द झाल्याने त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 400 लोकल फेऱ्या अंशत: रद्द आणि लांबपल्ल्याच्या 60 फेऱ्या रद्द होणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गोरेगाव ते बोरीवलीचे काम जून 2024 पर्यंत पूर्ण
मुंबई सेंट्रल ते बोरीवली 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेच्या कामासाठी एमयूटीपी -2 अंतर्गत साल 2008 मध्ये मंजूरी मिळाली होती. सुरुवातीला 430 कोटी असलेले या कामाचे बजेट 930 कोटी झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाअभावी हे काम जमीन मिळत नसल्याने रखडले आहे. गोरेगाव ते बोरीवली टप्प्याचे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. पाचवी आणि सहावी मार्गिका वांद्रेपर्यंत पूर्ण झाली तरी तेथून पुढे मुंबई सेंट्रलपर्यंत काम जागे अभावी रखडणार आहे.