VIDEO: संजय राठोड, दाऊद ते मलिक, फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतले 7 मोठे मुद्दे, ठाकरे सरकारची घेराबंदी?
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्याने या अधिवेशनाकडे अधिक लक्ष लागलं आहे.
मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांना अटक झाल्याने या अधिवेशनाकडे अधिक लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची (bjp) भूमिका आणि रोख स्पष्ट केला आहे. फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नवाब मलिक यांची अटक ते त्यांचे दाऊदशी असलेले संबंध यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच एसटी कामगारांच्या मागण्यांवरूनही ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. यावरून विरोधकांकडे सरकारविरोधातील भरपूर दारूगोळा असून उद्या होणाऱ्या अधिवेशनात विरोधक सरकारची घेराबंदी करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील सात मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश.
- दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी… नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार.
- नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजाला जपण्याचा, पोलरायजेशन करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारकडून केला जात आहे. संजय राठोडांचा राजीनामा लगेच होतो, पण देशद्रोह्यांसोबत असलेल्या वाचवण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. त्यांच्यातील काही लोक दाऊदची धुणी-भांडी करतात. त्यांना आधी दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही असं सांगा. माझ्या पत्रकार परिषदेप्रमा्णे त्यांच्याही पत्रकार परिषद घ्या. फिक्समॅच करु नका.
- परिक्षांचे घोटाळे संपले नाही, भ्रष्टाचाराने कळस गाठलाय, हे आजवरचं सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. लिपिक साहेबांना लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे. याचा जाब सरकारला विचारू.एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालं आहे. या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो, तो म्हणजेच दारु उत्पादन करणारा. बेवड्यांना समर्पित हे सरकार आहे, बेवड्यांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाही. त्यामुळे सरकारचे काळे कामं बाहेर काढू.
- शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी स्थिती आहे. कर्जमाफीतील अपूर्ण बाबी द्यायला लावणार.
- विविध समाजांचे प्रश्न आहेत. खासदार संभाजी छत्रपती यांना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले आणि पुन्हा तिच आश्वासने सरकारने दिली.
- तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. तुम्ही म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरूनही त्यांनी आघाडी सरकारवर हल्ला चढवला. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत हे सरकार कोडगं आहे. 80 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या यांना दिसत नाहीत. अहंकार डोक्यात जातो, आम्ही म्हणजे सत्ता, असं सरकार आता वागतंय. त्याचं प्रत्यंतर त्यांना पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या:
VIDEO: आयटी घोटाळा झाला असेल तर करा ना कारवाई, कुणी थांबवलं; देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान
चिमुरडीची Style पाहिली का? Kacha Badamवर अशी थिरकली की, पुन्हा पुन्हा पाहाल ‘हा’ Viral video