नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार, एकनाथ शिंदे यांचा जनतेशी संवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवासासाठी एसटी मोफत केली.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी जनतेशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, शेतकरी, कामगार, वंचित, सोशित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आमचा ध्यास आहे. सर्वसामान्यांच्या आशा आकांशा उमटेल यावर आमचा भर आहे. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल. हीच आपल्या सर्वांसोबत आमचीही भावना आहे. यासाठी आम्ही सर्वांनी एकजूट केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवासासाठी एसटी मोफत केली. 52 दिवसांत या योजनेत एक कोटीपेक्षा अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला.
दोन हेक्टऐवजी तीन हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. तीस लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटी रुपयांची मदत मिळतेय. निकषामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांदेखील मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला. 755 कोटी रुपयांची त्यांनादेखील मदत केली.
भूविकास बँकेचं कर्ज घेतलेले सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलेत. एकाच दिवशी सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा केले.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला. आरोग्यासाठी दुप्पट निधी देण्याचा आमचा सरकार निर्णय घेत आहे. राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरू आहे. वाहतुकीसाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी देण्याचा निर्णय या सरकारनं घेतलाय.
हे जनतेच्या मनातलं सरकार आहे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन पुढं जाणार असं हे सरकार आहे. त्यासाठी जनतेत जाऊन काम करतोय. हा केवळ एक टप्पा आहे. सरकारला मोठी मजल गाठायचा आहे. निरामय आरोग्य लाभावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.