हिंमत असेल तर वरळीतून लढून दाखवाच; आदित्य ठाकरे यांचं पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
मी राजीनामा देतो. तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही.
मुंबई: ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट राजीनामा देण्याचं आव्हानच दिलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आदित्य ठाकरे यांचं आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वरळीतील एका कार्यक्रमातून बोलताना त्यांनी हे आव्हान दिलं.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं. मी राजीनामा देतो. तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. शिवसैनिक विकला जाणार नाही, असं सांगतानाच वरळीतून उभं राहा. तुम्हाला पाडणारच, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
निवडून येताच कसे ते पाहतो
यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांनाही आव्हान दिलं आहे. 40 आमदारांनी गद्दारी केली. तुम्हाला आव्हान आहे आमदारकीचा राजीमाना द्या. गद्दार खासदारांना आव्हान आहे. तुम्हीही खासदारकीचा राजीनामा द्या. निवडून येताच कसे ते पाहतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पारदर्शक सरकार म्हणजे काय?
आदित्य ठाकरे यांनीही दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारवर टीका करताना ठाकरे सरकारची स्तुती केली होती. पारदर्शक सरकार म्हणजे काय? लोकांचं सरकार म्हणजे काय? हे महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात पाहिलं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
खरी गुंतवणूक आणली
आम्ही डाव्होस दौरा केला. पण आम्ही खरी गुंतवणूक आणली. घटनाबाह्य सरकारसारखी बोगस गुंतवणूक आणली नाही. घटनाबाह्य सरकार चेहरा दाखवू शकत नाही. म्हणून मुखवटा लावून फिरत आहेत. कोव्हिड नसताना खोटा मास्क लावून फिरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.
त्यांना रोखायचंय
‘आपला दवाखाना’ शिवसेनेने सुरू केलेला आहे. या गद्दारांनी नाही, असंही त्यांनी ठणकावलं आहे. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं या हेतूने काम करणाऱ्यांना आता आपल्याला रोखायचं आहे, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केलं होतं.